Join us

पाच दिवसांत विमानतळावर पकडले ७ कोटींचे सोने- ११ आयफोन जप्त, २४ प्रकरणांत कारवाई

By मनोज गडनीस | Published: May 24, 2024 6:09 PM

गेल्या तीन महिन्यांत दहापेक्षा जास्त प्रकरणात सोने पोटात लपविण्याचे प्रकार उजेडात आले आहेत

मुंबई - गेल्या १७ मे ते २२ मे या कालावधीमध्ये एकूण २४ प्रकरणांत मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण ११ किलो सोने, ११ आयफोन आणि अन्य काही इलेक्ट्रॉनिक वस्तू अशी एकूण ७ कोटी ४६ लाख रुपयांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणात एकूण २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या पैकी एका प्रकरणात दुबईत आलेल्या दोन भारतीय प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांनी २ किलो सोन्याची पेस्ट हे सॅनिटरी पॅडमध्ये लपविल्याचे आढळून आले. तर, अन्य एका प्रकरणात एका व्यक्तीने सोने पोटात लपविल्याचेही आढळून आले.

गेल्या तीन महिन्यांत दहापेक्षा जास्त प्रकरणात सोने पोटात लपविण्याचे प्रकार उजेडात आले आहेत. या खेरीज, ट्रॉली बॅगातील चोर कप्पे, कपड्यांमध्ये देखील सोन्याची पेस्ट, सोन्याची पावडर तसेच सोन्याचे दागिने लपविल्याचे आढळून आले आहे. याचसोबत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शारजा येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाकडून ११ आयफोन आणि ३ लॅपटॉप जप्त केले आहेत. यांची एकूण किंमत २३ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.