झवेरी बाजारातून व्यावसायिकाचे ७० लाखांचे सोने पळवले
By मनीषा म्हात्रे | Published: October 29, 2023 02:52 PM2023-10-29T14:52:33+5:302023-10-29T14:53:13+5:30
जोगेश्वरीतील व्यावसायिक शहाब उदीदीन इकबाल मंडाई (३०) हे झवेरी बाजार येथील अरिहंत टंच सेंटर येथे दागिने विक्रीसाठी आले होते
मुंबई : झवेरी बाजारात सोने विक्रीसाठी आलेल्या जोगेश्वरीतील व्यावसायिकाचे ७० लाख किंमतीचे सोने पळविल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
जोगेश्वरीतील व्यावसायिक शहाब उदीदीन इकबाल मंडाई (३०) हे झवेरी बाजार येथील अरिहंत टंच सेंटर येथे दागिने विक्रीसाठी आले होते. सोन्याचे वजन करत असतानाच जगदीश बगाराम माली याने शहाब यांची नजर चुकवून काऊंटरवरील सोने घेवून पळ काढला. यामध्ये जवळपास ७० लाख किंमतीचे १२७०.६३० ग्रॅम वजनाच्या दागिन्यांचा समावेश होता. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे चार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार यांनी शनिवारी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी माली विरोधात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. तो राजस्थानचा रहिवासी आहे. या घटनेने परीसरात खळबळ उडाली. पोलीस परिसरातील सीसीटिव्हीच्या मदतीने तपास करत आहे.