मुंबई - गेल्या आठवडाभरामध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण २० प्रकरणांत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण १२ किलो ७४ ग्रॅम सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८ कोटी १७ लाख रुपये इतकी आहे. तर, याचसोबत १४ लाख रुपयांचे आयफोन देखील जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात एकूण पाच लोकांना अटक करण्यात आली आहे.
जे सोने पकडण्यात आले आहे ते प्रामुख्याने सोन्याची पावडर व सोन्याची पेस्ट या प्रकारात होते. दोन प्रकरणात सोन्याचे बार तर एका प्रकरणात सोन्याचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत. दुबई, अबुधाबी, बाहरिन, जेद्दा, मस्कत येथून प्रामुख्याने या सोन्याची तस्करी झाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींपैकी चार आरोपी हे भारतीय नागरिक आहेत तर एक आरोपी परदेशी नागरिक आहे. तर, दुबईतून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत १४ लाख रुपये किमतीचे एकूण ९ आयफोन आढळून आले. ते देखील जप्त करण्यात आले आहेत.