Join us

मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 5:40 AM

विमानतळावरील काही कर्मचारी सोने तस्करी करीत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काही कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवली होती.

मुंबई : मुंबई विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी सोने तस्करीचा पर्दाफाश केला असून, धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रकरणी विमानतळावर कार्यरत पाच कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सोने तस्करीच्या प्रकरणात विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची ही गेल्या काही महिन्यांतील पाचवी  घटना आहे.

विमानतळावरील काही कर्मचारी सोने तस्करी करीत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काही कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवली होती.

सलीम अन्वर नावाचा एक कर्मचारी जेव्हा स्वच्छतागृहातून बाहेर आला त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी व तपासणी केली.

त्याच्या कमरेपाशी त्याने एका मोज्यामध्ये सोन्याची पावडर लपविल्याचे आढळून आले. एका प्रवाशाने आपल्याला ती पावडर दिल्याची कबुली त्याने दिली. मात्र, आपल्या सुपरवायझरच्या सूचनेनुसार आपण ती घेतली असल्याचेही त्याने अधिकाऱ्यांना सांगितले.

सुपरवायझरकडून तस्करीची कबुली

अधिकाऱ्यांनी त्याच्या सुपरवायझरची चौकशी केली असता त्याने या तस्करीची कबुली दिली. तसेच, आपल्यासोबत आणखी तीन जण हे काम करीत असल्याचे सांगितले. यामध्ये एका महिलेचादेखील समावेश होता. तिच्याकडून अधिकाऱ्यांनी दीड किलो सोने जप्त केले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत एक कोटी रुपये इतकी आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडील सोने हे कर्मचारी विमानतळाबाहेर पोहोचविण्याचे काम करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

टॅग्स :सोनं