सुवर्ण मुहूर्त : सोने-चांदीत आज ५०० कोटींची उलाढाल शक्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 08:26 AM2022-04-02T08:26:35+5:302022-04-02T08:27:19+5:30
सोन्याचा भाव ५१ ते ५२ हजार रुपये प्रति तोळा असू शकेल, अशी माहिती सराफ बाजारातून देण्यात आली.
सचिन लुंगसे
मुंबई : राज्य सरकारने कोरोना संदर्भात सर्व निर्बंध मागे घेतल्याने साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. सराफ बाजारही सज्ज झाला असून शनिवारी मुहूर्तावर मुंबईसह महाराष्ट्रातील सराफ बाजारात ५०० कोटींची सोन्याच्या दागिन्यांची उलाढाल होईल, असा अंदाज आहे. एकट्या मुंबईत ३०० कोटींच्या आसपास उलाढाल होऊ शकते. सोन्याचा भाव ५१ ते ५२ हजार रुपये प्रति तोळा असू शकेल, अशी माहिती सराफ बाजारातून देण्यात आली.
का वाढेल सोनेखरेदी
दोन वर्षांपासूनच्या कोरोना निर्बंधांतून आता सुटका झाल्याने सण-उत्सव आणि समारंभ धडाक्यात साजरे होतील. याचा फायदा म्हणून पुन्हा सराफ बाजार उसळी घेईल. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्तरावर ४५ टन सोने विकले जाईल. तर महाराष्ट्रात सोने खरेदीचे व्यवहार ५०० कोटी रुपयांच्या आसपास जातील. मुंबईत ३०० कोटींच्या आसपास नोंदविण्यात येईल, अशी माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी दिली.
यामुळे तेजीचा अंदाज
n संपूर्ण देशामध्ये जुलैच्या मध्यापर्यंत ४० लाख लग्न होणार आहेत. त्यामुळे सोने बाजाराला आणखी चकाकी
प्राप्त होईल, असा विश्वास सराफांनी व्यक्त केला आहे.
n दिवाळीमध्ये सोन्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार अपेक्षित झाले नव्हते. मात्र, आता निर्बंध उठल्याने खरेदी - विक्री मोठ्या उत्साहाने होईल.
एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर लग्नसराई आहे. त्यामुळे सोने खरेदीत अधिक वाढ होईल, अशी आशा आहे.