मुंबईतील जुहू बीचवर गोल्डमॅन गँगची विनामास्क भटकंती, नुसता धिंगाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 03:58 PM2021-08-06T15:58:59+5:302021-08-06T16:01:02+5:30
मुंबईतील जुहू बीचवर गोल्डमॅन गँगकडून धिंगाणा घालण्यात आला. नाईट कर्फ्यू असतानाही रात्री बारा वाजताच्या सुमारास या टोळीतील सदस्यांनी धुडगूस घातला. दहा ते बारा गाड्यांमधून जवळपास 50 जणांनी जुहू चौपाटी परिसरात धिंगाणा घातला.
मुंबई - पुण्यातील पहिले गोल्डमॅन म्हणून नावाजलेले दिवंगत नेते रमेश वांजळे यांनी गोल्डमॅनची ओळख महाराष्ट्राला करुन दिली. त्यानंतर, अनेक गोल्डमॅन समोर आले, कुणी सोन्याचा शर्ट घालून गोल्डमॅन झालं. तर कुणी कोरोना काळात सोन्याचा मास्क बनवून गोल्डमॅन झालं. मात्र, गोल्डमॅन गँगचा आता पाहायला मिळाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील जुहू बीचवर ही गोल्डमॅन गँग धिंगाणा घालत होती. हातात आणि गळ्यात मोठ्या प्रमाणात सोनं घातलेले पैलवानच रात्री हिंडताना दिसले.
मुंबईतील जुहू बीचवर गोल्डमॅन गँगकडून धिंगाणा घालण्यात आला. नाईट कर्फ्यू असतानाही रात्री बारा वाजताच्या सुमारास या टोळीतील सदस्यांनी धुडगूस घातला. दहा ते बारा गाड्यांमधून जवळपास 50 जणांनी जुहू चौपाटी परिसरात धिंगाणा घातला. गळ्यात सोन्याच्या जाडजूड चेन घातलेल्या या गोल्डमॅन गँगला पाहून सर्वजण अवाक झाले होते. मुंबईत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू आहे. मात्र, जुहू चौपाटीवर गुरुवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास 10 ते 12 गाड्या दाखल झाल्या, त्यातून जवळपास 50 जण बाहेर पडले. त्यात अनेकजण गोल्डमॅन असल्यासारखेच दिसत होते. सध्या या गँगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, सोशल मीडियातून या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत.
मुंबईत रात्रीची संचारबंदी असताना हे गोल्डमॅन का फिरत होते, यांना ना कोरोनाचे भान होते, ना संचारबंदीचे. त्यामुळे, या गोल्डमॅन गँगवर पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, गोल्डमॅन गँगचा ग्रुपने फिरण्याचा हेतू काय होता, याचाही पोलिसांनी तपास करणे आवश्यक आहे.