Join us

गोल्फ कोर्स कर्मचा-यांची अरेरावी

By admin | Published: November 03, 2014 12:39 AM

खारघरमधील गोल्फ कोर्समधून आदिवासी पाड्यांवर जाणा-या आदिवासींना गोल्फ कोर्समधील कर्मचा-यांकडून दादागिरी केली जात असल्याचे समोर आले आहे.

वैभव गायकर, नवी मुंबईखारघरमधील गोल्फ कोर्समधून आदिवासी पाड्यांवर जाणा-या आदिवासींना गोल्फ कोर्समधील कर्मचा-यांकडून दादागिरी केली जात असल्याचे समोर आले आहे. स्वतंत्र रस्त्याअभावी आदिवासी बांधवांना गोल्फ कोर्समधूनच पाड्यांवर जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या अरेरावीने धमोळेवाडीतील आदिवासी भीतीच्या छायेत जगत आहेत. गोल्फ कोर्स मधूनच धमोळेवाडीमध्ये आदिवासीपाडा प्रवेश करण्याचे एकमेव मार्ग आहे. आदिवासी पाड्यातील समस्या जाणून घेण्यासाठी लोकमतचे प्रतिनिधी गोल्फ कोर्समधून जात होते. मात्र यावेळी सिडकोने नेमलेल्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिनिधीशी दादागिरी करत इतर कर्मचाऱ्यांना बोलावून धमक्या देत अर्वाच्च भाषा केली. गोल्फ कोर्सलगत असणाऱ्या आदिवासी पाड्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही आले असल्याचे सांगून देखील याठिकाणी व्यवस्थापक असलेल्या दिलीप मोरे यांनी मारामारीची धमकी दिली. असाच अनुभव आदिवासीपाड्यात जाणाऱ्या अनेकांना रोजच मिळत आहे. विशेष म्हणजे सिडको प्रशासन देखील अशाप्रकारे बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कानाडोळा करत आहे. धन दांडग्यांचा खेळ म्हणून गोल्फला ओळखले जाते. गोल्फ कोर्स हिरवळीने नटला असल्याने खेळासाठी नव्हे तर किमान हा परिसर पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र खारघरमधील गोल्फकोर्समध्ये फिरकणे हे सर्वसामान्यांसाठी कठिण होऊन बसले आहे.खारघरमधील सेंंट्रल पार्कमध्ये देखील काही दिवसांपूर्वी मद्यपींनी दारूपिऊन धिंगाणा घातला होता. एकीकडे सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या सिडकोकडून मात्र या प्रकरणीही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. याठिकाणी असलेल्या आदिवासी पाड्यात जाण्यासाठी सिडकोने स्वतंत्र रस्ता बनवला नसल्याने गोल्फ कोर्समधूनच या पाड्यांत प्रवेश करावा लागतो. यावेळी या पाड्यात जाणाऱ्या प्रत्येकाला याठिकाणचे कर्मचारी अडथळा निर्माण करतात. या पाड्यासाठी स्वतंत्र्य रस्त्याची मागणी देखील करण्यात आली होती मात्र सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान गोल्फ कोर्समधील प्रकरणाची माहिती घेऊन संबधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सिडकोचे जनसंपर्क आधिकारी मोहन निनावे यांनी सांगितले.