गनेडीवाला होणार हायकोर्टात न्यायाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 04:08 AM2019-01-20T04:08:01+5:302019-01-20T04:08:04+5:30
जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने शिफारस केली आहे.
मुंबई : जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने शिफारस केली आहे. मात्र एस. बी. अगरवाल या आणखी एका जिल्हा न्यायाधीशाचे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सुचविलेले नाव ‘कॉलेजियम’ने मंजूर न करता परत पाठविले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांची संमती घेतल्यानंतर मुख्य न्यायाधीशांनी श्रीनिवास मोडक, एन. जे. जामदार, पी. व्ही. गनेडीवाला, व्ही. जी. जोशी, एस. बी. अगरवाल व आर. जी. अवचट या सहा जिल्हा न्यायाधीशांची नावे उच्च न्यायालयावरील संभाव्य नेमणुकीसाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये पाठविली होती. त्यापैकी मोडक, जामदार, जोशी व अवचट यांची ‘कॉलेजियम’ने निवड केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्तीही झाली. आता गनेडीवाला यांचीही नेमणूक होणे अपेक्षित आहे. सहापैकी फक्त एकट्या अगरवाल यांचेच नाव नाकारण्यात आले आहे.