आमदारांनी मुलाखतीला यावे तो काळ गेला, जनता ठरवेल तोच पक्ष माननारा नेता 

By महेश गलांडे | Published: November 28, 2020 01:20 AM2020-11-28T01:20:11+5:302020-11-28T02:45:49+5:30

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी ते काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीला हजर राहु शकले नव्हते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, दीड वर्षापासून मला किडनीचा त्रास आहे. काँग्रेसच्या मुलाखती झाल्या, त्या दिवशी खरेच मी मुंबईत होतो

Gone are the days when MLAs should come for interviews, the people will decide who is the leader of the party MLA Bharat bhalake | आमदारांनी मुलाखतीला यावे तो काळ गेला, जनता ठरवेल तोच पक्ष माननारा नेता 

आमदारांनी मुलाखतीला यावे तो काळ गेला, जनता ठरवेल तोच पक्ष माननारा नेता 

Next

सोलापूर : आमदार भारत भालके यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले, ऐन कार्तिकी एकादशीचा उपवास सोडून द्वादशीला या विठ्ठल भक्ताची प्राणज्योत मालवली. संतांची भूमी असलेल्या मंगळवेढा आणि लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरातील जनतेला पोरकं करुन नानांनी आज जगाचा निरोप घेतला. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात नानांचा चांगलाच दबदबा होता, जनतेचा नेता म्हणून त्यांची ओळख बनली होती. त्यामुळेच, गेल्या तीन टर्म वेगवेगळ्या चिन्हावर विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन गुलाल उधळण्याचं भाग्य नानांना लाभलं. आमदारांनी मुलाखतीला यावे तो काळ गेला, आता जनता ठरवेल तोच पक्ष, असे म्हणत अपक्ष ते काँग्रेस आणि काँग्रेस ते राष्ट्रवादी असा प्रवास भारत भालकेंनी केला. पंढरपूरच्या सर्वसामान्य जनतेवर असलेल्या विश्वासातूनच त्यांनी विजयाची हॅटट्रीक साधली.  

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी ते काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखतीला हजर राहु शकले नव्हते. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, दीड वर्षापासून मला किडनीचा त्रास आहे. काँग्रेसच्या मुलाखती झाल्या, त्या दिवशी खरेच मी मुंबईत होतो. तुम्हाला डॉक्टरची चिठ्ठी दाखवू का? तसेच आमदारांनी निवडणुकीसाठी मुलाखती द्यायच्या असतात का, असा सवालही भालके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला होता. आमदार भारत भालके कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीला नव्हता असे विचारल्यावर आमदार भालके म्हणाले, खरेच त्या दिवशी मी उपचारासाठी मुंबईला गेलो होतो. हवे तर त्यादिवशी मी डॉक्टरकडून घेतलेल्या उपचाराचे रेकॉर्ड दाखवितो. विद्यमान आमदारांनी मुलाखतीला यावे, असा आदेश कोणत्याच पक्षाने काढलेला नाही. आमदारांनी निवडणूक लढविण्यासाठी मुलाखतीला यावे तो काळ आता गेला आहे. त्यामुळे मला अजून रांगेतच उभे करू नका, असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, आगामी विधानसभा लढविताना तुमचा पक्ष कोणता असे विचारल्यावर आमदार भालके म्हणाले होती की, जनता ठरवेल तो पक्ष. यापूर्वीच्या तीन निवडणुका मी गावकऱ्यांशी चर्चा करूनच लढविल्या आहेत. त्याप्रमाणे माझ्या भेटीगाठी सुरू आहेत, त्यामुळे माझ्या मतदारात कोणताच संभ्रम नाही. भाजप प्रवेशाबाबत आमदार भालके म्हणाले की, मी कोणत्याच पक्षाकडे अर्ज केलेला नाही. आषाढी यात्रेनिमित्त राज्याचे प्रमुख, मुख्यमंत्री पंढरपूर भेटीला येत आहेत म्हणून मी विमानतळावर भेटीला गेलो. पाहुणचार म्हणून मी त्यांना नमस्कार केला, पण त्याची खूप चर्चा झाली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवार घेत निवडणूक लढवली आणि जिंकलीही होती.  

भालकेंची हॅटट्रिक
भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले आहेत. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या चिन्हातून ते सभागृहात पोहोचले. सन 2009 च्या निवडणुकांवेळी सर्वप्रथम अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर, 2014 च्या निवडणुकांवेळी ते काँग्रेसकडून विजयी झाले होते. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार होते. मात्र ऐनवेळी निर्णय बदलून ते राष्ट्रवादीत दाखल झाले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवून, हॅटट्रिक केली.
 

Web Title: Gone are the days when MLAs should come for interviews, the people will decide who is the leader of the party MLA Bharat bhalake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.