चांगल्या विमानसेवा बंद होणे दु:खदायक: रिचर्ड ब्रॅनसन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:45 AM2019-12-12T05:45:47+5:302019-12-12T05:46:27+5:30

मुंबई-पुणे हायपरलूपबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार

Good Airline Closure Tragic: Richard Branson | चांगल्या विमानसेवा बंद होणे दु:खदायक: रिचर्ड ब्रॅनसन

चांगल्या विमानसेवा बंद होणे दु:खदायक: रिचर्ड ब्रॅनसन

Next

मुंबई : कोणतीही विमानसेवा चालविणे हे अत्यंत खडतर काम आहे. त्यामुळे भारतातील चांगल्या विमानसेवा बंद होणे दु:खदायक आहे, असे मत व्हर्जिन अ‍ॅटलांटिकचे संस्थापक सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी मुंबईत व्यक्त केले. बुधवारी व्हर्जिनतर्फे मुंबई ते लंडन दरम्यान नवीन विमानसेवा सुरू केल्याची घोषणा केल्यानंतर ते बोलत होते.

कंपनीच्या विस्ताराबाबत माहिती देताना ब्रॅनसन म्हणाले की, मार्च, २०२० पासून दिल्ली ते लंडनदरम्यान दुसरी दैनंदिन फेरी सुरू करण्यात येणार आहे. व्हर्जिन अटलांटिकसाठी युके व युएसनंतर भारत हा तिसरा मोेठा देश ठरेल. यावेळी ‘आरिया’ या त्यांच्या नवीन आयकॉनचे अनावरण करण्यात आले. मुंबईतील हवाई प्रवाशांच्या संख्येत २५ टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई - पुणे हायपर लूप सेवेबाबत गैरसमज दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी भेट घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुण्याचा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात करता येईल. या प्रकल्पासाठी पूर्ण १० अब्ज डॉलर्सचा निधी खासगी कंपनीद्वारे उभारण्यात येईल. यासाठी लास वेगासमध्ये इंजिनीअरची टीम कार्यरत असून, मुंबईत येण्यास ते तयार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील कंपनीच्या प्रवासाला २०२० मध्ये २० वर्षे पूर्ण होतील. आमच्या मनात भारताचे महत्त्वपूर्ण स्थान आहे, असे ते म्हणाले.

अपयश ही यशासाठीची महत्त्वाची गुंतवणूक

यावेळी आयोजित ‘अपयशातून शिकणे’ या परिसंवादात ब्रॅनसन यांच्यासोबत महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी भाग घेतला. ब्रॅनसन म्हणाले की, अपयश आल्यास दुसऱ्या दिवशी पूर्ण ताकदीने व नव्या उमेदीने मी यशासाठी प्रयत्नशील होतो. त्यावेळी अपयश हा इतिहास ठरलेला असतो. उद्योग सुरू करताना आर्थिक पाठबळ नसते, तेव्हा यश व अपयश यामध्ये अत्यंत बारीक रेषा असते, त्याची जाणीव ठेवून काम करत राहण्याची गरज असते, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आनंद महिंद्रा म्हणाले की, अपयशाला मी भांडवल समजतो व अपयश येण्यामध्ये कोणती कारणे आहेत, याचा अभ्यास करून पुढील वेळी अपयशातून यश कसे मिळेल, याकडे लक्ष देतो. अपयश ही यश मिळविण्यासाठी महत्त्वाची गुंतवणूक असल्याचे मी समजतो.

Web Title: Good Airline Closure Tragic: Richard Branson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.