Join us

मुंबईतील चांगल्या इमारती ठरत आहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:06 AM

सात वर्षांपूर्वी दुरुस्त इमारत महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केली आहे. एवढेच नव्हे, तर ही इमारत रिकामी करण्यासाठी पालिकेची फौज मंगळवारी येथे धडकली.

मुंबई : सात वर्षांपूर्वी दुरुस्त इमारत महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केली आहे. एवढेच नव्हे, तर ही इमारत रिकामी करण्यासाठी पालिकेची फौज मंगळवारी येथे धडकली. अखेर रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. स्थानिक विकासकाचे भले करण्यासाठी चांगली इमारत धोकादायक दाखविण्याचा घाट अधिकाºयांनी घातला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी केला आहे. अशा अनेक इमारती विकासक व पालिका अधिकारी संगनमताने धोकादायक ठरवित असल्याचा हल्लाच त्यांनी चढविला आहे.कुर्ला, माचिस फॅक्टरी येथील श्री सद्गुरू साईनाथ मित्रमंडळ या इमारतीची दुरुस्ती २००९-२०१०मध्ये करण्यात आली. यासाठी तब्बल तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तरीही ही इमारत महापालिकेने धोकादायक इमारत श्रेणी सी १ मध्ये या इमारतीचे नाव टाकताच रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली. या इमारतीचे स्वत: आॅडिट करून अहवाल पालिकेला सादर करण्याची तयारी रहिवाशांनी दाखविली. मात्र, पालिका अधिकाºयांनी थेट मंगळवारी या इमारतीचे पाणी तोडण्याची कारवाई सुरू केली.स्थानिक विकासकाला ही जागा हवी असल्याने जाणीवपूर्वक ही इमारत धोकादायक दाखविण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी केला. रहिवाशांच्या आंदोलनामुळे तूर्तास आजची कारवाई टळली. मात्र, तीन दिवसांनी पुन्हा अधिकारी धडकणार असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. पालिका अधिनियम ३३ (७) अंतर्गत विकासकाला चार एफएसआयचा फायदा मिळवून देण्यासाठी अधिकारी इमारती धोकादायक दाखवत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. याप्रकरणी विरोधी पक्ष पालिका महासभेत आवाज उठविणार आहेत.

टॅग्स :मुंबई