सराफा बाजाराला अच्छे दिन!
By admin | Published: October 29, 2016 04:00 AM2016-10-29T04:00:19+5:302016-10-29T04:00:19+5:30
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला तुफान प्रतिसाद देत ग्राहकांनी सराफा बाजाराला शुक्रवारी सुखद धक्का दिला. धनत्रयोदशीला सुमारे ४०० कोटी रुपयांच्या उलाढालीची
मुंबई : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला तुफान प्रतिसाद देत ग्राहकांनी सराफा बाजाराला शुक्रवारी सुखद धक्का दिला. धनत्रयोदशीला सुमारे ४०० कोटी रुपयांच्या उलाढालीची शक्यता व्यक्त करणाऱ्या सराफा बाजारात एका दिवसात
सुमारे ४५० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव जास्त आहे. त्यामुळे प्रतिदिन २०० ते २२५ कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या सराफा बाजारात जास्तीत जास्त ४०० कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करण्याची शक्यता मुंबई ज्वेलर्स संघटनेने व्यक्त केली होती. मात्र छोट्या दागिन्यांसह मोठ्या दागिन्यांची खरेदी करत ग्राहकांनी सराफांना सुखद धक्का दिल्याची प्रतिक्रिया संघटनेचे प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली.
जैन म्हणाले की, राज्यातील दुष्काळ हटल्यामुळे बऱ्यापैकी खरेदीची शक्यता बाजारात व्यक्त केली जात होती. मात्र गतवर्षी प्रतितोळा २५ हजार ४७१ रुपये दर असलेले सोने यंदा प्रतितोळा ३० हजार ३४० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे मुहूर्तासाठी बहुतेक ग्राहक छोट्या दागिन्यांची खरेदी करण्याची शक्यता होती. मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लग्नसराईच्या मुहूर्तांमुळे ग्राहकांनी मोठ्या दागिन्यांची बुकिंग सुरू केली. यामध्ये सोन्याच्या नाण्यांपासून अंगठी, सोनसाखळी, बांगड्या, पाटल्या, बुगडी,
झुमके, चपलाहार, लक्ष्मीहार या दागिन्यांना अधिक मागणी होती. (प्रतिनिधी)
बाजारपेठा हाऊसफुल्ल!
आॅनलाइन शॉपिंगची धूम असतानाही धनत्रयोदशीला दादर मार्केटमधील गर्दी तसूभरही कमी झालेली नव्हती. दिवाळीच्या खरेदीसह धनत्रयोदशीला काही तरी खरेदी करण्यासाठी दादरच्या प्रत्येक गल्लीत मुंबईकरांनी तोबा गर्दी केली होती.
सकाळपासूनच दादरला धाव घेतलेले मुंबईकर दुपारच्या रणरणत्या उन्हातही खरेदी करताना दिसले. दिवाळीला सुरुवात झाली असली; तरीही दिवा, पणती, रांगोळी, कंदील, फटाके, कपडे आणि अगदी फराळ खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. सर्वच वस्तू स्वस्तात मस्त मिळत असतानाही ग्राहक घासाघीस करताना दिसत होते.
बाजारातील दिवे व पणत्या विक्रेत्यांनी सांगितले की, काही विक्रेते चिनी वस्तू विकत असले, तरी बहुतांश विक्रेत्यांनी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देत चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. हँडमेड कंदिलांना अधिक मागणी असल्याचेही बाजारात दिसले. यंदा प्रथमच ग्राहकांकडून चिनी वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तूंची मागणी होताना दिसली.
स्वदेशीचा आग्रह... स्वदेशी वस्तूंची विक्री करणारे दशरथ गावडे म्हणाले की, चिनी वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेत स्वदेशी फटाके विक्रीसाठी ठेवलेले आहेत. लोकांकडूनही चिनी फटाक्यांना बगल देत स्वदेशी फटाक्यांची मागणी केली जात आहे.
चिनीला पर्याय हवाच... स्वदेशीसोबत चिनी बनावटीचे शोभेचे इलेक्ट्रॉनिक दिवे विक्रीसाठी ठेवल्याचे जुबेर शेख या विक्रेत्याने सांगितले. तो म्हणाला की, दोन्ही प्रकारच्या दिव्यांना प्रतिसाद मिळत आहे. इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रात आजही देश चीनच्या मागे आहे, हे कबूल करावे लागेल. शिवाय एकाच प्रकारच्या वस्तूसाठी चीनच्या तुलनेत स्वदेशी वस्तूंची किंमत अधिक आहे. त्यामुळे कमी किमतीत मागणी करणाऱ्या ग्राहकांना चिनी वस्तू विकण्याशिवाय पर्याय नाही. या समस्येवर पर्याय शोधावाच लागेल.
खरेदीसाठी महिला आघाडीवर... खरेदी म्हटले की महिला आघाडीवर असतात, याचा प्रत्यय मुंबईतील प्रमुख बाजारपेठांत आला. स्ट्रेट कट आणि साइड कट या प्रकारच्या कुर्त्यांना अधिक मागणी असल्याचे कुर्ते विक्रेते सुनील वैश यांनी सांगितले. तर अंगुरी पॅटर्न, राजस्थानी आरी पॅटर्न यांसारख्या ड्रेस व ड्रेस मटेरियल्ससाठी महिलांनी मंगलदास मार्केट आणि हिंदमाता मार्केटमध्ये गर्दी केल्याचे निदर्शनास आले.