बालेकिल्ल्यात ‘अच्छे दिन’

By admin | Published: October 6, 2016 04:44 AM2016-10-06T04:44:27+5:302016-10-06T04:44:27+5:30

मनसेने शिवसेनेच्या दादर येथील बालेकिल्ल्याला गेल्या पालिका निवडणुकीत खिंडार पाडले होते़ याची बोच शिवसेना पक्षनेतृत्वाच्या मनात होती़

The 'Good Day' in the Citadel | बालेकिल्ल्यात ‘अच्छे दिन’

बालेकिल्ल्यात ‘अच्छे दिन’

Next

मुंबई : मनसेने शिवसेनेच्या दादर येथील बालेकिल्ल्याला गेल्या पालिका निवडणुकीत खिंडार पाडले होते़ याची बोच शिवसेना पक्षनेतृत्वाच्या मनात होती़ मात्र फेररचनेत मनसे नगरसेवकांचे वॉर्ड उडाल्यामुळे शिवसेनेला अखेर दादरमध्ये ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दादरमध्ये शिवसेनेचे मुख्यालय आहे़ हा बालेकिल्ला गेली अनेक वर्षे अभेद्य होता़ मात्र मनसेने त्याला खिंडार पाडून शिवसेनेला तेथून हद्दपार केले़ त्यानंतर दादरमध्ये शिवसेना व मनसेत रस्सीखेच सुरूच राहिली़ हा गड ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू होते़ याला यश येऊन विधानसभेत हा गड सेनेकडे आला. मात्र प्रभाग अजूनही मनसे शिलेदारांकडे होते़ मात्र प्रभाग फेररचना आणि आरक्षणात मनसेला जोरदार झटका बसला. माहीम विधानसभेत पूर्वी असलेले पाच प्रभाग आता चार झाले आहेत़ येथे मनसेचे वर्चस्व होते़ परंतु फेररचनेत मनसेचे गटनेते संदीप देशपांडेच गारद झाले आहेत़ मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधीर जाधव यांचा प्रभागही आरक्षणात गेला आहे, तर श्रद्धा पाटील आणि मनिष चव्हाण यांनाही धक्का बसला आहे़
शिवसेनेने गेल्या पाच वर्षांमध्ये हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत़ त्यात मनसेचे शिलेदार बाद झाल्याने शिवसेनेसाठी मार्ग खुला झाला आहे़ मनसेला येथे ताकदीचे उमेदवार उतरवावे लागतील़

आता शेजारच्या प्रभागात हवी उमेदवारी
मुंबई : आरक्षणाने तारले तरी फेररचनेत झटका बसलेल्या नगरसेवकांचा निम्मा प्रभाग फुटला आहे़ मात्र गेल्या पाच वर्षांत केलेल्या मतबांधणीवर सहजासहजी पाणी सोडण्यास दिग्गज नगरसेवक तयार नाहीत़ त्यामुळे आपला जास्तीत जास्त मतदार असलेल्या बाजूच्या प्रभागात उमेदवारी मिळवण्यासाठी नगरसेवकांनी आतापासून फिल्डिंग लावली आहे़
फेररचनेत ८० टक्के प्रभाग बदलले असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते़ तरीही यातून आपला प्रभाग बचावेल, या आशेवर असलेल्या नगरसेवकांचे स्वप्न सोमवारी भंग झाले़ नुसती फेररचनाच नव्हे तर प्रभागाचे तुकडेच झाले असल्याचे समोर आले आहे़
त्यामुळे गेली पाच वर्षे विकासकाम केलेला प्रभाग दुसरीकडेच फेकला गेल्याचे उजेडात आले आहे़ हा झटका कमी नव्हता की काय, म्हणून आरक्षणाने वाट्याला आलेल्या प्रभागातही पत्ता साफ झाला़

माहीम आणि धारावीमध्ये महिला प्रभागांची संख्या अधिक आहे़ एफ दक्षिणमध्ये सलग तीन प्रभाग महिला झाले आहेत़
बोरीवलीच्या आसपास बरेच प्रभाग खुले आहेत़ मालाडमध्ये पाच प्रभाग सलग महिला व इतर मागासवर्गासाठी राखीव झाले आहेत़
भांडुपमध्ये सलग सहा प्रभाग महिला आरक्षित आहेत़ कुर्ल्यात खुले व इतर मागासवर्ग प्रवर्गांचे आरक्षण आहेत़ घाटकोपरमध्ये सलग सहा प्रभाग महिला आरक्षित आहेत़

काही नगरसेवकांना आरक्षणामुळे आसपासच कुठे प्रभाग उरला नसल्याने आजूबाजूच्या खुल्या व आरक्षित प्रभागांमध्ये उडी मारण्याची त्यांनी तयारी केली आहे़ मात्र तेथे आधीच इच्छुक असल्याने तिकीट वाटपावेळी पक्षांमध्येच जोरदार रस्सीखेच होईल़

स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष यशोधर फणसे, विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा रितू तावडे, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, मनसेचे संतोष धुरी, शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर

Web Title: The 'Good Day' in the Citadel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.