मुंबई ते पुणे शिवनेरीला आले ‘अच्छे दिन’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:51 AM2019-09-23T04:51:44+5:302019-09-23T06:55:52+5:30
तिकीट दर कमी केल्याचा परिणाम; मागील ७५ दिवसांत ६० हजार प्रवासी वाढले
मुंबई : मुंबई ते पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरीचे तिकीट दर ८० ते १०० रुपये कमी केल्याने, मागील ७५ दिवसांत तब्बल ६० हजार प्रवासी वाढले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
८ जुलैपासून शिवनेरीची भाडेकपात करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक फेरीला तीन ते चार हजार प्रवासी वाढले. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर, २०१८ या कालावधीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीमध्ये प्रवासी संख्या वाढली.
वाढलेले तिकीट दर आणि ओला-उबेरसारख्या टॅक्सी सेवेशी स्पर्धा, यामुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येमध्ये प्रचंड घट झाली होती. त्यामुळे एसटीच्या वाहतूक विभागाने दर कपातीच्या प्रस्ताव एसटीच्या संचालक मंडळाकडून मंजूर करून घेतला. ८ जुलैपासून शिवनेरीची कमी दरातील सेवा मुंबई ते पुण्याच्या विविध मार्गांवर सुरू झाली. पहिल्या दिवसापासून शिवनेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या काळात पुणे-मुंबई मार्गावर रेल्वेच्या अनियमित फेऱ्यांमुळे शिवनेरीने जास्त उत्पन्न कमावले होते.
मागील १० वर्षांपासून एसटीचा ‘शिवनेरी’ हा ब्रँड मुंबई पुण्याच्या मध्यमवर्गीयांमध्ये अतिशय लोकप्रिय झाला आहे. सध्या ११८ बसच्या माध्यमातून सरासरी २७५ फेºया मुंबई ते पुणे या मार्गावर होतात. शनिवार ते सोमवार या दिवशी जास्त फेºया चालविण्यात येतात. दादर ते पुणे स्टेशन या मार्गावर दर पंधरा मिनिटाला सकाळी ५ पासून रात्री ११ पर्यंत शिवनेरी धावत असते, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.