मुंबई - मोबाईलचे हँण्डसेटचे उत्पादन करणा-या भारतीय कंपन्यांना पहिल्या टप्प्यातील लाँकडाऊनच्या काळात तब्बल १५ हजार कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. परंतु, कोरोनानंतरच्या आर्थिक अरिष्टामुळे जवळपास सर्वच उद्योगांवर संकट कोसळणार असले तरी मोबाईलच्या मागणीमध्ये घसरण होणार नाही असे निरीक्षण इंडिया सेल्युलर अँण्ड इलेक्ट्राँनीक असोसिएशनने (आयसीईए) नोंदविले आहे. सोशल डिस्टंसिंगमुळे यापुढे सर्वच आघाड्यांवरील संस्कृती बदलणार आहे. त्यासाठी मोबाईलची मागणी वाढेल असा तर्क त्यासाठी मांडण्यात आला आहे.
भारतात गेल्या वर्षी १५ कोटी ८० लाख मोबाईल फोनची विक्री झाली होती. अमेरिकेला मागे टाकून भारताने चीन पाठोपाठ दुसरा क्रमांक पटकावला होता. २०१९ सालातील जानेवारी ते मार्च या तिमाहीतील मोबाईल विक्रीची तुलना यंदाच्या जानेवारी आणि मार्च महिन्याशी केल्यास त्यात ४ टक्के घट झाली आहे. केवळ लाँकडाऊनच्या कालावधीतच नव्हे तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतही थोडीफार घट नोंदवण्यात आली होती. लाँकडाऊनच्या काळात उत्पादनासह खरेदी विक्री सुध्दा बंद होती. त्याचा मोठा फटका मोबाईल कंपन्यांना बसला आहे. परंतु, हा कालावधी संपल्यानंतर उत्पादन प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर मागणी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
लाँकडाऊनच्या काळात बहुसंख्य लोक वर्क फ्राँम होम पद्धतीने काम करत होते. शाळा बंद असल्याने आँनलाईन पद्धतीने धडे गिरवले जात होते. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आँलनाईन अँपचा वापर वाढला होता. तर मनोरंजनासह कार्यालयीन बैठकासुध्दा त्याच पद्धतीने होत होत्या. अनेक चर्चासत्रांना (बेबिनार) हजारो लोकांनी घरात बसून हजेरी लावली. त्यामुळे मोबाईलचे महत्व अधोरेखित झाले आहे. भविष्यातील सोशल डिस्टंसिंगच्या निर्बंधामुळे मोबाईलची गरज आणखी वाढेल. मोबाईल न वापरणारेसुध्दा मोबाईल खरेदी करतील असे निरीक्षण आहे.
मोबाईल किंमतीत वाढ : मोबाईलवरील जीएसटी १२ वरून १८ टक्के करण्यात आल्याने अनेक कंपन्यांनी आपल्या मोबाईल हँण्डसेटच्या किंमतीत १ एप्रिलपासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १० हजार रुपये किंमतीपर्यंतच्या स्मार्ट फोनची मागणी वाढ होईल असे सांगितले जात असले तरी मध्यम किंमतीच्या फोनच्या विक्रीत वाढ होण्याबाबत मात्र साशंकता आहे.