मुंबई : देशातील सरकारी बँकांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत एकही सरकारी बँक तोट्यात नाही. या बँकांनी एकूण ४८,८७४ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २०२०-२१ या वित्त वर्षात सरकारी बँकांनी एकूण ३१,८२० कोटी रुपयांचा नफा कमावला होता. चालू वित्त वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांतच बँकांनी यापेक्षा अधिक नफा कमावला आहे.
कराड यांनी सांगितले की, २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत बहुतांश सरकारी बँका तोट्यात होत्या. २०१७-१८ मध्ये बँकांचा एकूण तोटा सर्वाधिक ८५,३७० कोटी रुपये होता. २०१८-१९ मध्ये तो कमी होऊन ६६,६३६ कोटी रुपये झाला. २०१९-२० मध्ये तोटा आणखी कमी होऊन २५,९४१ कोटी रुपये झाला. २०१५-१६ मधील तोटा १७,९९३ कोटी रुपये, तर २०१६-१७ मधील तोटा ११,३८९ कोटी रुपये होता.
२३,३४७ वर शाखांची संख्या
संसदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, २००९-१० ते २०१४-१५ या कालावधीत सरकारी बँका नफ्यात होत्या. ३१ मार्च २०१० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत या बँकांच्या शाखांची संख्या ५८,६५३ वरून वाढून ८४,६९४ झाली. यात महानगरांतील शाखांची संख्या १३,५९६ वरून वाढून १६,३६९ झाली. निमशहरी भागातील शाखांची संख्या १४,९५९ वरून २३,३४७ वर गेली.