"राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी ही दोन टोके जुळवल्याशिवाय सुशासन प्रत्यक्षात येणे कठीण"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 05:29 AM2018-12-03T05:29:29+5:302018-12-03T05:30:04+5:30
राजकीय नेते आणि अधिकारी ही दोन टोके जुळवल्या शिवाय सुशासन प्रत्यक्षात येणे कठीण आहे.
मुंबई : राजकीय नेते आणि अधिकारी ही दोन टोके जुळवल्या शिवाय सुशासन प्रत्यक्षात येणे कठीण आहे. ‘प्रशासन’ या पुस्तकाच्या निमित्ताने इतक्या नामवंतांची एकत्र बांधणी करणे हेच मोठे आव्हान जोशी सरांनी पेलले आहे. हे पुस्तक म्हणजे समाजाचा आरसा आहे. यातील एकही पान गळले तरी समाज पूर्ण होणार नाही, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले
शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या ‘प्रशासन’ या पुस्तकाचे रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि पुस्तकात ज्यांच्या मुलाखती आहेत ते सर्व मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकास उद्धव ठाकरे यांची प्रस्तावना आहे. या पुस्तकात जोशी यांनी, प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या १३ मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
मनोगत व्यक्त करताना जोशी म्हणाले, प्रशासकीय कामातील दिरंगाई देशाच नुकसान करते. म्हणूनच आपापल्या क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठलेल्या नामवंतांच्या मुलाखती असलेले हे पुस्तक अनेकांना दिशा देईल. यात प्रशासनाबद्दल एकूण १६-१७ लोकांची मते आहेत. हे पुस्तक समाजसुधारणेचा भाग आहे. सरकार दरबारी गेलेला माणूस हसत बाहेर येण्यासाठी यामुळे मदत होईल.
या पुस्तकात निवृत्त न्यायाधीश भीमराव नाईक, उद्योगमंत्री सुभाष नाईक, निवृत्त मुख्य सचिव दिनेश अफझलपुरकर, माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे, निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, शिक्षण क्षेत्रातील विद्यालंकार देशपांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सहकारतज्ज्ञ विनय कोरे, उद्योजक गिरीश व्यास, प्रशासन पीडित व्यक्तींचे प्रतिनिधी म्हणून मनोहर भोसले अशा विविध व्यक्तींच्या मुलाखतींचा सामावेश आहे.