आज हलक्या सरी, उद्या मुसळधार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:33 AM2019-08-07T03:33:38+5:302019-08-07T03:33:56+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या पावसाने विश्रांती घेतली आहे
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारसह रविवारी सकाळी मुसळधार सरींनी मुंबईला झोडपून काढले होते. परिणामी, सखल भागात पाणी साचल्याने मुंबईचे जनजीवन विस्काळीत झाले. सोमवारी पावसाने घेतलेली विश्रांती मंगळवारीही कायम राहिली. मंगळवारी मुंबईत तुरळक ठिकाणी अधूनमधून सरी बरसल्या. बुधवारीही हलक्या सरी बरसतील, असा अंदाज असतानाच, गुरुवारी मात्र मुंबईत मुसळधार सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. ५ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. ३० ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही.
दिल्ली उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भाग, दक्षिण राजस्थान, ओडिशा, उत्तराखंडमधील काही भागांत मान्सून सक्रिय होता. येथे काही ठिकाणी मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. तेलंगणा, विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणासह तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये मान्सून सर्वसामान्यपणे कार्यरत होता. येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. हरियाणा, राजस्थान, गुजरात, बिहारमध्ये मात्र मान्सूनचा प्रभाव कमी होता.
येत्या २४ तासांत ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण मध्य प्रदेश, दक्षिण कोकण आणि गोव्यात मान्सूनचा जोर वाढेल. येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील उर्वरित भाग आणि कर्नाटकच्या किनारी भागात मान्सून सक्रिय राहील. येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, दक्षिण झारखंड, विदर्भ, मराठवाडा, उत्तर कोकण, पूर्व राजस्थान, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणात मान्सूनचा जोर सर्वसाधारण राहील. येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तामिळनाडू आणि पश्चिम राजस्थानात मान्सूनचा जोर राहणार नाही. परिणामी, येथील वातावरण कोरडे राहील.