‘गुडलक’मुळे ‘जेजे’जवळ वाहतूककोंडी
By admin | Published: July 6, 2017 07:00 AM2017-07-06T07:00:20+5:302017-07-06T07:00:20+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दक्षिण मुंबईतील जेजे उड्डाणपुलाखाली सर्रासपणे चारचाकी गाड्या पार्क केल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दक्षिण मुंबईतील जेजे उड्डाणपुलाखाली सर्रासपणे चारचाकी गाड्या पार्क केल्या जात आहेत. गुडलक मोटर ट्रेनिंग स्कूलच्या कित्येक गाड्या उड्डाणपुलाच्या तोंडाशीच पार्क केल्याने चालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.
मोटर ट्रेनिंग स्कूलच्या ट्रकपासून कारपर्यंत विविध प्रकारच्या गाड्या जेजे उड्डाणपुलाखाली पार्क केल्या जातात. उड्डाणपुलाशेजारीच वाहतूक पोलिसांचा पहारा असतो. मात्र उड्डाणपुलाखाली पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाई होताना दिसत नाही. मुळात उड्डाणपुलाच्या तोंडाशीच पार्क केलेल्या गाड्यांमुळे जेजे रक्तपेढी आणि जेजे पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच वाहतूककोंडी झाल्याचे दिसते. ही कोंडी गर्दीच्या वेळी उत्तरेकडील सिग्नलपर्यंत पोहोचते. कधी-कधी त्याचा फटका नागपाड्यापर्यंत जाणवतो.
एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असतानाही, या वाहनांवर कारवाई का होत नाही, असा सवाल युवा ऊर्जा फाउंडेशनने व्यक्त केला आहे. फाउंडेशनचे आशिष चव्हाण म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उड्डाणपुलाखाली वाहने पार्क करण्यावर शासनाने बंदी आणण्याची गरज आहे. तसे प्रतिज्ञापत्रही सरकारने उच्च न्यायालयात दिले आहे. अशा परिस्थितीत कोंडीस कारण ठरणाऱ्या बेकायदा पार्किंगवर कारवाईची गरज आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून गाड्या पार्क करणाऱ्या ट्रेनिंग स्कूलवर वाहतूक पोलीस इतके मेहरबान का आहेत?, याचे उत्तर सरकारने पोलिसांनी विचारायला हवे.
यासंदर्भात पायधुनी विभागाचे पोलीस निरीक्षक पी. तांबे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
दोन दिवसांत कारवाई करणार
कालच या संदर्भातील उच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्र सादर झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या वाहनांवर कारवाई केली जाईल.
- प्रमोद तांबे, पोलीस निरीक्षक-पायधुनी विभाग