शुभेच्छा... सुषमा अंधारेंनी सांगितलं नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 04:53 PM2023-07-07T16:53:51+5:302023-07-07T17:01:29+5:30
शिवसेना पक्षात सुषमा अंधारे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली.
मुंबई - शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हे यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरु होती. पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची भूमिका विषद केली. तसेच, सटरफटर लोकांमुळे नाराज व्हायची गरज नाही, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना टोला लगावला आहे. आता, सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन नीलम गोऱ्हेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्या शिंदेंच्या शिवसेनेत का गेल्या हेही अंधारेंनी सांगितलंय.
शिवसेना पक्षात सुषमा अंधारे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली. दसरा मेळाव्यात सुषमा अंधारेंचं भाषण, तिथेच उपनेते पदाची जबाबदारी आणि राज्यभर सभांसाठी दौऱ्याचे नियोजन यामुळे शिवसेनेतील महिला नेतृत्त्व नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. त्यातच, आमदार मनिषा कायंदे यांनीही सुषमा अंधारेंच्या प्रवेशावरील आपली नाराजी जाहीर करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी, त्यांनीही सुषमा अंधारेंवर प्रत्यक्षपणे टीका केली होती. आता, नीलम गोऱ्हे यांनीही सुषमा अंधारेंवरील प्रश्नावर उत्तर देताना, सटरफटर म्हणत त्यांना बेदखल केलं. आता, सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन नीलम गोऱ्हेंवर निशाणा साधला.
''तब्बल पाच वेळा विधानपरिषद आणि आता उपसभापती पद भूषवणाऱ्या पुरोगामी (?) नीलमताई आज वेगळी भूमिका घेत आहेत. त्यांच्या या नवीन प्रवासाला शुभेच्छा आणि भावी आरोग्यमंत्री पदासाठी ऍडव्हान्समध्ये अभिनंदन'', असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले आहे. सुषमा अंधारे यांनी एकप्रकारे नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत का गेल्या, हेही ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
तब्बल पाच वेळा विधानपरिषद आणि आता उपसभापती पद भूषवणाऱ्या पुरोगामी (?) नीलमताई आज वेगळी भूमिका घेत आहेत. त्यांच्या या नवीन प्रवासाला शुभेच्छा आणि भावी आरोग्य मंत्री पदासाठी ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन...!!@AUThackeray@OfficeofUT@rautsanjay61@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) July 7, 2023
... म्हणून मूळ शिवसेनेत पक्षप्रवेश, अंधारेंवरही बोचरी टीका
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचे कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितले. तसेच, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन ही शिवसेना पुढे जात असून हीच खरी शिवसेना असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा मी निर्णय घेतला आहे. शिवसेनेत मी चांगलं काम केलं आहे. पण आता राष्ट्रीय भूमिका आणि राज्यातले प्रश्न यासाठी शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय मी घेतला, असेही त्यांनी म्हटले. तसेच, उपस्थित पत्रकारांनी सुषमा अंधारेंबद्दल प्रश्न विचारला असता, सटरफटर लोकांमुळे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी नसते, असेही गोऱ्हे यांनी म्हटले.