कडक कारवाईची मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंकडूनही राम कदमांना शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 04:51 PM2019-10-11T16:51:48+5:302019-10-11T16:52:02+5:30
घाटकोपरमधील मनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर चढत आहे. त्यामुळे विरोधीपक्षासह मित्रपक्षांच्या हालचालीवर उमेदवाराकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. तर सोशल मीडियावर काय सुरू आहे, याचीही दखल घेण्यात येते. भाजप उमेदवार राम कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. प्रचंड बहुमताने निवडून येण्यासाठी साहेबांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या, माझ्यासाठी तो प्रेरणादायी क्षण असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे.
घाटकोपरमधील मनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी काही शिवसैनिकही उपस्थित होते. मात्र, चुक्कल यांनी पुष्पहार अर्पण करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच 'ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है' असं कॅप्शन लिहण्यात आलं होतं. त्यानंतर, आता भाजपा उमेदवार राम कदम यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपा-शिवसेना-आरपीआई कार्यकर्ते महायुतीला विजयी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे राम कदम यांनी म्हटले आहे. मात्र, राम कदम यांच्या या भेटीनंतर नेटीझन्सकडून उद्धव ठाकरे आणि कदम भेटीचा समाचार घेण्यात येत आहे.
दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी मुली पळवून आणून तुम्हाला देऊ, असे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना या वृत्तपत्रातून भाजप नेतृत्वावर टीका केली होती. तसेच राम कदम यांच्यावर कडक कारवाई का केली नसल्याची मागणी केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपाने राम कदम यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, आता उद्धव ठाकरेंनी राम कदम यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे, भाजपानंतर शिवसेनेकडूनही राम कदम यांना माफी मिळाली का? अशी चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.