पोलिसांचे गुड मॉर्निंग पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2016 03:30 AM2016-09-15T03:30:09+5:302016-09-15T03:30:09+5:30
बाप्पाचा विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुड मॉर्निंग पथके तैनात केली आहेत. संवेदनशील ठिकाणे आणि विसर्जन पॉइंटवर विशेष बंदोबस्त ठेवला आहे.
मुंबई : बाप्पाचा विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुड मॉर्निंग पथके तैनात केली आहेत. संवेदनशील ठिकाणे आणि विसर्जन पॉइंटवर विशेष बंदोबस्त ठेवला आहे. तसेच अतिरेकी कारवायांच्या दृष्टीने तसेच सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून वॉच टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण शहरावर नजर ठेवली आहे.
विसर्जनाच्या दिवशी शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवानांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १२ तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्रकृती दल, फोर्सवन आणि सिव्हिल डिफेन्स तैनात ठेवण्यात आल्याचे पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.
चार दिवसांपासून सर्व संवेदनशील ठिकाणी नजर ठेवण्यात आली आहे. गुड मॉॅर्निंग पथकांना अलर्ट करण्यात आले आहे. विसर्जन पॉइंटवर विशेष लक्ष असणार आहे.
शहरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉॅवर, ड्रोन, मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने संशयित व्यक्ती, सामान आणि वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. अतिरेकी हल्ल्यांपासून सुरक्षेच्या दृष्टीने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष देण्यात आले असून प्रत्येक ठाण्याचे एक विशेष पथक तैनात ठेवण्यात आले आहे.