मुंबई-
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आता या दोन्ही मार्गांवर २० नवीन एसी लोकल धावणार आहेत. एसी लोकलचे तिकीट दर ५० टक्क्यांनी कमी केल्यानंतर आता एसी लोकलच्या संख्येत वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. सध्या मध्य रेल्वेवर ४४ एसी लोकल धावत आहेत. तिकीट दरात कपात झाल्यानंतर एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे हार्बर मार्गावरील एसी लोकल मात्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावर एसी लोकलला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यानं या मार्गावरील एसी लोकल बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
मध्य रेल्वेवर १ ते ८ मे दरम्यान दररोज २८ हजार १४१ प्रवाशांनी एसी लोकलनं प्रवास केला. तर हार्बर मार्गावर ३ हजार २९९ प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला. हार्बर मार्गावरील कमी प्रतिसाद पाहता या मार्गावरील एसी लोकल आता मध्य रेल्वे मार्गावर वळवण्यात येईल.