मुंबई - कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या बेस्टच्या परिवहन उपक्रमासाठी एका गुड न्यूज आहे. तिकिट विक्रीतून मिळणा-या बेस्टच्या दररोजच्या उत्पन्नात 25 लाखांनी वाढ झाली आहे. बेस्टच्या प्रवासी संख्येमध्ये ब-यापैकी वाढ होतेय. मागच्या दोन महिन्यात बेस्टची प्रवासी संख्या 28 लाखावरुन 30 लाख म्हणजे दोन लाखांनी वाढ झाली आहे.
बेस्ट उपक्रमाच्या संचलनात आवश्यक बदल केल्यानंतर सुधारणा झाल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिक कोकिळ यांनी सांगितले. बेस्टेचे वेळापत्रक आणि मार्गांमध्ये केलेले काही तर्कसंगत बदल तसेच व्यस्ततम मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार जास्तीत जास्त बसगाडया उपलब्ध करुन देण्याचा निर्णय यामुळे बेस्टच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
प्रवासी सुविधेला आमचे पहिले प्राधान्य आहे. महसूल वाढीसाठी प्रवाशांच्या सूचना, मत सुद्धा महत्वाची आहेत असे अनिल कोकिळ यांनी सांगितले. क्रॉफेड मार्केट, चर्चगेट आणि सीएसएमटी या मार्गावरील बेस्ट बसेसच्या फे-यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. नव्या मार्गांमुळे महसूलात वाढ होईल तसेच टॅक्सी आणि रिक्षाकडे वळलेल्या प्रवाशांना परत आणता येईल असे कोकिळ म्हणाले.
क्रॉफोर्ड मार्केटमधील बससेवेमुळे टॅक्सीच्या दररोजच्या 900 फे-या कमी झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. बेस्टला तिकिटविक्रीतून दररोज 2.75 कोटींचे उत्पन्न मिळायचे ते आता 3 कोटींपर्यंत गेले आहे. एखाद्यादिवशी ते 3.10 कोटींच्या घरात जाते असे एका वरिष्ठ वाहतूक अधिका-याने सांगितले. बेस्टने महापालिकेकडून घेतलेले बरेचसे कर्ज फेडल्याचे कोकिळ यांनी सांगितले. महापालिकेचे 1600 कोटी रुपयांचे कर्ज होते ते आता आम्ही आता 386 कोटींवर आणले आहे असे कोकिळ म्हणाले. बेस्टच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार बेस्टचे एकूण तोटा 1900 कोटी रुपये आहे तो भरुन निघायला अजून 10 वर्ष लागतील.