मुंबई : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला वाढीव वीजबिल आले. यासंदर्भात जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. वाढीव वीजबिलांबाबतीत राज्यातील जनतेला दिवाळीच्या आधी चांगली बातमी मिळेल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.सोमवारी राऊत यांनी चेंबूरच्या टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मी ऊर्जामंत्री झाल्यापासून ० ते १०० युनिट वीज मोफत देण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासंदर्भातील नियाेजन करण्यात येत आहे. वीजपुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही अडथळ्याविना सलग ४ तास व्यवस्थित वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिलेे.
वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीआधी चांगली बातमी - नितीन राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 1:53 AM