मुंबई - केंद्र सरकारच्या सूचनांनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी पीक विमा अर्ज दाखल करण्याची मुदत 24 जुलैपर्यंत देण्यात आली होती. मात्र, अर्ज करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
राज्य सरकारने शासन निर्णय काढून ही वाढ करण्याचे आल्याचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार 25 जुलै ते 29 जुलै अशी पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला पीक विमा अर्ज दाखल करुन केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीकविमा खरीप हंगाम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सरकारतर्फे करण्यात आले आहे. तसेच, संबंधित विमा कंपन्यांना याबाबत जनजागृती आणि प्रचार-प्रसार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या अवर सचिव नीता शिंदे यांनी राज्यपाल यांच्या आदेशान्वये हे परिपत्रक जारी केले आहे. दरम्यान, पीक विम्याचे पोर्टल सातत्याने हँग होत असल्याने शेतकरी पीक विमा काढण्यासाठी सायबर कॅफेंचे उंबरठे झिजवित आहेत. पीक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतही पीक विमा तांत्रिक अडचणींमध्ये अडकलेला होता. त्यामुळे लाखो शेतकरी सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यामुळेच पीक विमा भरण्यासाठी मुतदवाढ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. राज्य सरकारने याची दखल घेत पीक विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.