सचिन लुंगसे
मुंबई :म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमती कमी करण्यात आल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी केली. यंदाच्या लॉटरी मधील विकास नियंत्रण नियमावली ३३(७) आणि ३३ (५) मधील ३७० घरांना हा निर्णय लागू झाला आहे. यंदाच्या लॉटरीमध्ये घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या असून अर्ज करण्यासाठीची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील म्हाडाच्या २ हजार ३० घरांच्या विक्रीसाठी अर्ज प्रकिया सुरू आहे.
लॉटरीच्या कालावधीत त्रयस्थांकडून घर मिळवून देतो अशा प्रलोभनांना बळी न पडता म्हाडा प्रणालीच्या माध्यमातूनच यात सहभाग घ्यावा. नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व घर लागल्यावर रकमेचा भरणा करणे या सर्व बाबी या पूर्णतः ऑनलाइन असणार आहेत. अर्जदारांना म्हाडा कार्यालयात यावे लागणार नाही.
नागरिकांना लॉटरीत सहभाग घेण्याकरिता नोंदणी प्रक्रिया अमर्याद खुली राहणार आहे. नोंदणी प्रक्रियेनंतर अर्जदाराचे कायम स्वरूपी प्रोफाइल नूतन संगणकीय सोडत प्रणालीमध्ये तयार होणार आहे. अर्जदारांच्या अर्जाची अचूक पडताळणी प्रणालीद्वारे होणार आहे. अर्जदारांची पात्रता सोडतीच्या आधीच निश्चित होणार असून या प्रणालीने पात्र ठरविलेले अर्जदारच सोडतीत सहभाग घेऊ शकतील.
किती टक्के किंमती कमी होणार
अत्यल्प उत्पन्न गट - २५ टक्केअल्प उत्पन्न गट - २० टक्केमध्यम उत्पन्न गट - १५ टक्के उच्च उत्पन्न गट - १० टक्के