लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मंत्रालयातील कामांव्यतिरिक्त इतर कामांसाठी मुंबई ते पुणे, असा प्रवास करणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने स्वारगेट-मंत्रालय-स्वारगेट, अशी शिवनेरी बस सेवा मंगळवारपासून सुरू केली आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी ही बस सेवा धावणार असून, या शिवनेरीचा प्रवास अटल सेतू मार्गे होणार आहे.
अटल सेतूमुळे प्रवासाचे अंतर बऱ्यापैकी कमी झाले असून, आता या मार्गावरून एसटी महामंडळाच्या बस धावू लागल्या आहेत. पुणे ते दादर, अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या बसला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालय-स्वारगेट बसची मागणी केली होती. त्यानुसार ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
सोमवारी मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी नोकरीसाठी तसेच सर्व सामान्य नागरिक कामासाठी मंत्रालयात येतात. त्यांना थेट मंत्रालयाजवळ सोडणारी दळणवळण सेवा आतापर्यंत नव्हती. एसटीच्या या सेवेमुळे मंत्रालय, विधिमंडळ, उच्च न्यायालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या परिसरात काम करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. महिलांना आणि ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना तिकीट दरात ५० टक्के तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना १०० टक्के सवलत आहे.
- सोमवारी : स्वारगेट ते मंत्रालय / सकाळी ६ वाजता- शुक्रवारी : मंत्रालय ते स्वारगेट / सायंकाळी ६:३० वाजता
तिकीट किती आहे?फुल्ल : ५६५ हाफ - २९५