वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी: कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांना ‘अभय’; बिले होणार माफ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 08:51 AM2024-08-31T08:51:57+5:302024-08-31T08:52:09+5:30

ग्राहकांना बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १ हजार ७८८ कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत.

Good news for electricity consumers Bills of 38 lakh disconnected consumers will be waived | वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी: कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांना ‘अभय’; बिले होणार माफ

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी: कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांना ‘अभय’; बिले होणार माफ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :वीज बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय’ योजना अमलात येणार आहे. या योजनेत ग्राहकांना बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १ हजार ७८८ कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, कोणत्याही जागेचा मालक, खरेदीदार किंवा ताबेदार यांना वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. दरम्यान, या कारवाईऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली आहे. 

३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही अभय योजना आहे. या थकीत बिलाच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. या योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ असा आहे. ३८ लाख ग्राहकांकडून मूळ बिलाची ५ हजार ४८ कोटी, तसेच १,७१९ कोटी व्याज आणि ६९ कोटी ९० लाख रुपये विलंब आकार येणे आहे. आता मात्र या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ होणार आहे.

हफ्त्यांमध्ये सवलत 
- मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरण्याची सवलत.
- घरगुती, व्यावसायिक हे लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत.  
- उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्क्यांची सवलत.
- भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या क्षेत्रातील ग्राहकांनाही योजना लागू. 

ग्राहकांनी १ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या अभय योजनेचा लाभ घ्यावा. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर वीज ग्राहकाला पुन्हा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.
- लोकेश चंद्र, अध्यक्ष, महावितरण 
 

Web Title: Good news for electricity consumers Bills of 38 lakh disconnected consumers will be waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज