Join us  

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना खूशखबर; मानधनात वाढ, मात्र अटी-शर्तींवर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 7:11 AM

राज्यात विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत.

मुंबई : राज्याच्या कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांमधील तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनवाढीचा अध्यादेश प्रसिद्ध झाला असून, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या लेक्चरसाठी आता ९०० रुपये तास या दराने मानधन दिले जाणार आहे; मात्र या प्राध्यापकांना  महाविद्यालयात रुजू होण्यापूर्वी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भविष्यात सेवेत कायम करण्याची मागणी करता येणार नाही; तसेच नियमित सेवेच्या कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही, असे हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. त्यामुळे ‘सीएचबी’ प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे महाविद्यालयांना शैक्षणिक कामकाज करणे अवघड जात आहे. शासनाकडून ही पदे भरली जात नाहीत. एका पूर्णवेळ पदाच्या बदल्यात दोन ‘सीएचबी’ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे; परंतु तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन फारच कमी असल्याने त्यात वाढ व्हावी, अशी मागणी विविध प्राध्यापक संघटनांकडून केली जात होती. अखेर प्राध्यापकांच्या मागणीला यश प्राप्त झाले असून, यापुढे सीएचबी प्राध्यापकांच्या व्याख्यानासाठी ९०० रुपये, तर प्रात्यक्षिकासाठी ७५० रुपये मानधन वाढविण्यात आले आहेत. ‘सीएचबी’चे सुधारित दर येत्या १ एप्रिलपासून लागू केले जाणार आहेत.  

‘सीएचबी’ प्राध्यापकांसाठी शासनाने घातलेली हमीपत्राची अट चुकीची असून, ती तत्काळ रद्द करावी. वर्षानुवर्षे प्राध्यापक पदे रिक्त असताना ‘सीएचबी’ प्राध्यापक काम करीत असतील तर त्यांच्या तो कार्यकाळ त्यांना सेवेत घेण्यासाठी कायम करण्यासाठी ग्राह्य धरलाच गेला पाहिजे. त्यामुळे ‘सीएचबी’ प्राध्यपकांच्या वाढीव मानधनाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावीच; मात्र हमीपत्राची अटही काढून टाकावी.  - संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना 

टॅग्स :महाराष्ट्र सरकारशिक्षक