आनंदाची बातमी: मुंबईतील कोस्टल रोडवरील ब्रिज आजपासून प्रवाशांच्या सेवेत; किती वेळ आणि इंधन वाचणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 08:10 IST2025-01-27T08:07:48+5:302025-01-27T08:10:55+5:30

हा मार्ग खुला करण्यात आल्याने वेळेची सुमारे ७० टक्के बचत होणार असून इंधनातही ३४ टक्के बचत होणार आहे.

Good news for Mumbai commuters Coastal Road to be in service from today how much time will it save | आनंदाची बातमी: मुंबईतील कोस्टल रोडवरील ब्रिज आजपासून प्रवाशांच्या सेवेत; किती वेळ आणि इंधन वाचणार?

आनंदाची बातमी: मुंबईतील कोस्टल रोडवरील ब्रिज आजपासून प्रवाशांच्या सेवेत; किती वेळ आणि इंधन वाचणार?

Mumbai Costal Road : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या (कोस्टल रोड) उत्तर वाहिनीचे लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं आहे.  हा रस्ता आजपासून प्रवाशांच्या सेवेत खुला करण्यात आला असून किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार आहे. प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून सोमवार २७ जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. यामध्ये मरीन ड्राईव्ह कडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका, मरीन ड्राईव्ह कडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश आहे," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये?

- धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता दक्षिण या मार्गाचे लोकार्पण झाले. यामुळे मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार.

- मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठी आंतरमार्गिका सुरू होणार. मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका सुरू होणार.
बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका देखील सुरू होणार.

- वाहतूक स्थिती : १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ५० लाख वाहनांचा प्रवास तर दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास.

- धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई किनारा रस्ता प्रकल्प व वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणारा पुल. या पुलाची एकूण लांबी ८२७ मीटर असून वजन २४०० मेट्रीक टन इतके आहे. हा प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. आजतागायत या प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

- प्रकल्पाचे फायदे : वेळेची सुमारे ७० टक्के बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत. याचे फलित म्हणून परकीय चलनाचीही बचत. ध्वनी प्रदूषण व वायुप्रदूषणात घट होण्यास मदत. ७० हेक्टर हरित क्षेत्राची निर्मिती. मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह साकारण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना नवीन विहारक्षेत्र लाभणार. या प्रकल्पात सागरी संरक्षण भिंतीची उभारणी. यामुळे किनाऱ्याची धूप होणार नाही आणि समुद्राच्या उंच लाटांपासून प्रकल्पाचे संरक्षण होईल.

- प्रकल्पाची वैशिष्ट्ये : बोगदा खनन संयंत्राच्या साहाय्याने भारतातील सर्वात मोठ्या व्यास (१२.१९ मीटर) असलेल्या बोगद्याची निर्मिती. भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यांमध्ये सकार्डो वायूजीवन प्रणालीचा वापर. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) उभारून पुलाची बांधणी. एकाच प्रकल्पामध्ये पुन:प्रापण करून रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग अच्छादित बोगदा, समुद्रक्षेत्र तसेच टेकडीखालून बोगदा, आरक्षणाची निर्मिती. भारतात सर्वप्रथम समुद्रकिनारी भरती-ओहोटी क्षेत्राखालून बोगद्याचे खनन व बांधकाम. या प्रकल्पात प्रवाळांच्या वसाहतींचे स्थलांतर ९० टक्के यशस्वी.

- प्रकल्पाचा एकूण खर्च १३ हजार ९८३ कोटी.
 

Web Title: Good news for Mumbai commuters Coastal Road to be in service from today how much time will it save

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.