मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना खूशखबर; कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख केली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 01:12 PM2024-01-07T13:12:48+5:302024-01-07T13:14:20+5:30
कोस्टल रोड सुरू झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास हातभार लागणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
CM Eknath Shinde ( Marathi News ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. तसंच ११ किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोड मार्गावरील ३.५ किमी लांबीच्या या बोगद्यातून प्रवास केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडच्या उद्घाटनाविषयीही माहिती दिली आहे. "कोस्टल रोडच्या एका टनेलचं काम मरीन ड्राइव्ह ते वरळी सी-फेसपर्यंत ३१ जानेवारीपर्यंत काम पूर्ण होणार असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या टनेलचं काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. हा मार्ग सुरू झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास हातभार लागणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज कोस्टल रोडचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या सकार्डो व्हेंटिलेशन सिस्टीमची माहिती घेतली. तसेच क्रॉस पॅसेजच्या कामाची पाहणी केली. या सकार्डो व्हेंटिलेशन सिस्टीममुळे बोगद्यात कोणताही धूर साठून राहणार नसून तो सक्शन करून बाहेर काढणं शक्य होणार आहे.
दररम्यान, या पाहणी दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, महापालिका अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, कोस्टल रोडचे मुख्य अभियंता स्वामी हेदेखील उपस्थित होते.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकही लवकरच होणार सुरू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची (एमटीएचएल) पाहणी केली होती. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एमटीएचएल खुला करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुंबई टान्स हार्बर लिंकच्या लोकार्पणादरम्यान मुंबईतल्या इतर प्रकल्पांचे लोकार्पणही होणार आहे. एमएमआरडीएच्या प्रकल्पांचे लोकार्पण रिमोटद्वारे होणार असून, राज्यातही डीप क्लीन मोहीम सुरू करणार आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.