CNG-PNG Price: गेल्या अनेक महिन्यांपासून महागाईने जनता त्रस्त आहे. मात्र, अशातच आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून, सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरांमध्ये मोठी कपात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने याबाबत निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे रविवार, ०१ ऑक्टोबरच्या रात्रीपासूनच हे दर लागू होणार आहेत. घरगुती वापरात वाढ व्हावी. तसेच वाहनधारकांनी सीएनजी वाहनांना प्राधान्य द्यावे, त्यात वाढ व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किंमतीमध्ये ३ रुपयांची तर पीएनजीच्या किंमतीमध्ये २ रुपयांची घट केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीमध्ये काहीशी घट करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. २ ऑक्टोंबरपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. दुसरीकडे, व्यावसायिक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
०२ ऑक्टोबरपासून नवे दर होणार लागू, किती असेल आता किंमत?
मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडच्या ग्राहकांना ७६ रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळेल. तर पीएनजी ४७ रुपयांना मिळेल. मोठ्या संख्येने वाहनधारक सीएनजी वाहनांचा वापर करतात. मुंबईत अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी पीएनजीचा वापर केला जातो. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडने घेतलेला दरकपातीचा निर्णय मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, मुंबईतील सीएनजी वापरकर्ते पेट्रोलवर ५० टक्के आणि डिझेलवर २० टक्के बचत करत आहेत. महानगर गॅसने प्रसिद्धीपत्रकात असेही म्हटले आहे की, पीएनजीचे दर घरगुती एलपीजीपेक्षा कमी आहेत. एलपीजीच्या तुलनेत पीएनजी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असल्याचे सांगण्यात आले आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्याच्या निर्णयाचे मुंबईकरांनी स्वागत केले आहे. यामुळे सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.