लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेट्रोच्या वाढत्या प्रवाशांचा विचार करत मुंबई मेट्रो वनने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील सेवा रात्री १२ वाजेपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्सोवा येथून शेवटची मेट्रो रात्री ११.१९ वाजता सुटेल. घाटकोपर येथे ११.४२ वाजता पोहोचेल. घाटकोपर येथून शेवटची मेट्रो रात्री ११.४४ वाजता सुटणार असून, वर्सोवा येथे १२.०७ वाजता दाखल होणार आहे. शिवाय दर चार मिनिटांनी एक मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमध्येदेखील वाढ करण्यात आली असून, हा आकडा आता ३२६ वरून ३५६ करण्यात आला आहे.
कोरोनाकाळात मेट्रोची सेवा २२ मार्च २०२० ते १८ ऑक्टोबर २०२० दरम्यान म्हणजेच तब्बल २११ दिवस बंद होती. मेट्रो सेवा ऑक्टोबर २०२० मध्ये सुमारे २३ हजार प्रवाशांच्या दिमतीने सुरू झाली. तीन महिन्यांत प्रवाशांचा आकडा १ लाखांवर गेला. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा प्रवासी संख्येवर परिणाम झाला. १ एप्रिल २०२२ पासून सर्व निर्बंध हटल्याने प्रवासी संख्या पुन्हा वाढू लागली. एप्रिल २०२२ दरम्यान प्रवासी संख्या २ लाख ५० हजारांवर पोहोचली. आता मेट्रोमधून ३ लाख २५ हजार प्रवासी प्रवास करत आहेत.
भुयारी ‘मेट्रो ३’चे आणखी चार डबे आले !कुलाबा - वांद्रे - सीप्झ या भुयारी मेट्रो ३ मार्गावरील पहिल्या मेट्रोसाठीच्या चाचणीसाठी आणखी चार डबे शुक्रवारी आरेतील सारीपूत नगर येथे दाखल झाले आहेत. चार डब्यांचा दुसरा रेक आंध्र प्रदेशातील श्रीसिटीहून मुंबईपर्यंत १ हजार ४०० किलोमीटरचा पल्ला गाठत दहा दिवसांनंतर पोहोचला आहे. ४२ टन वजनाचा प्रत्येक डबा खास प्रकारच्या ट्रेलरवरून आणण्यात आला. या ८ - एक्सेल ट्रेलर्सना ६४ चाके असतात. आता येत्या दोन दिवसांत या डब्यांची जुळणी करून सारीपूत नगरातील तात्पुरत्या सुविधेमध्ये एक ट्रेन तयार केली जाईल. त्यानंतर लगेचच ट्रेनच्या तपासणीसह चाचणी करण्यात येईल.