Join us

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख ठरली, PM मोदींच्या हस्ते लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 2:20 PM

पहिल्या फेजमधील चार लेनचं उद्घाटन होणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Mumbai Coastal Road Opening Date ( Marathi News ) : मुंबई शहरातील वरळी ते मरीन ड्राइव्ह यादरम्यान उभारण्यात आलेल्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. वरळी ते मरीन ड्राइव्ह असा हा १० किलोमीटरचा रस्ता आहे. यातील पहिल्या फेजमधील चार लेनचं उद्घाटन होणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या फेजचं लोकार्पण झाल्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या टप्प्याचंही लोकार्पण होणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी माहिती दिली आहे. 

कोस्टल रोड प्रकल्पासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च आला असून या प्रकल्पामुळे वाहनधारकांचा वेळेत मोठी बचत होणार आहे. या प्रकल्पाचं ८४ टक्के काम पूर्ण झाल्याचं इकबालसिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे.  

दरम्यान, अंधेरीतील गोखले पूलही २५ एप्रिल रोजी रहदारीसाठी खुला होणार असल्याची माहिती आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.

काय आहेत कोस्टल रोड प्रकल्पाची वैशिष्ट्ये?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष ऑक्टोबर, २०१८ मध्ये सुरु झालं आहे. या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे. एवढेच नव्हे तर वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल. त्यासोबत समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन अतिरिक्त हरित पट्टयांची निर्मिती देखील होणार आहे. एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे.

प्रकल्पामुळे होणारे फायदे

किनारी रस्त्यामुळे वेळेत ४० टक्के तर इंधनात ३४ टक्के बचत होणार आहे.

ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचे जीवनमान उंचावेल.

हरित क्षेत्रामध्ये- सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, फुलपाखरु उद्यान, जैव वैविध्यता उद्यान इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. प्रकल्पामध्ये ८.५ कि.मी.ची सागरी पदपथ निर्मिती.

किनारी रस्त्यावर समर्पित बस वाहतूक योजिले असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यात मदत होईल व संरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवास करता येईल.

रुग्णवाहिन्यांसाठी जलद प्रवास.

प्रस्तावित सागरी तटरक्षक भिंतींची योजना केल्यामुळे सध्याच्या सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून, वादळी लाटा व पुरापासून संरक्षण.

टॅग्स :मुंबईवरळीनरेंद्र मोदीपंतप्रधान