मुंबई- राजधानी मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक ०५.०७.२०२२) सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरली जाते.
मुंबईत गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे.
या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले.
या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.
तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. (५४५५ दशलक्ष लिटर)
हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.