Join us

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! तानसा तलावही भरला; ७ तलावांपैकी आतापर्यंत २ तलाव पूर्ण

By जयंत होवाळ | Published: July 24, 2024 6:19 PM

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात तलावांपैकी तानसा तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगला.

मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात तलावांपैकी तानसा तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगला. आज दुपारी ४ वाजून १६ मिनिटांनी हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याने दिली . यापूर्वी २० जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. तर आज त्यापाठोपाठ तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी आतापर्यंत २ तलाव पूर्ण भरुन वाहू लागले आहेत.

मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून आज सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ५८.५८ टक्के इतका जलसाठा आहे. .. आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे. हा तलाव गतवर्षी २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर २०२२ साली १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि २०२१ मध्ये २२ जुलै रोजी पहाटे ५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.