लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जूनमध्ये पावसाने दिलेली ओढ आणि तलावांत आटत चाललेला पाणीसाठा या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पाणीपुरवठ्यात १ जुलैपासून दहा टक्के कपात जाहीर केली होती. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पाणीकपातीचा निर्णय पालिकेकडून मंगळवारी मागे घेण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना आता पूर्ववत पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
तानसा, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि मोडकसागर या सात धरण आणि तलावांतून मुंबईला नियमित पाणीपुरवठा होतो.
जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस लांबल्याने पाणीपातळी घटून साठा १२ टक्क्यांपर्यंत आला होता. मात्र, जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने सातही तलावांत आतापर्यंत ८१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ही स्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही कायम राहणार असून पावसाचे दोन महिने अद्याप शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर १ जुलैपासून लागू करण्यात आलेली पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आला.
तलावक्षेत्रात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी, पुढील दोन महिन्यांत काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास त्यानुसार योग्य निर्णय घेण्यात येईल. सबब नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना करण्यात आले आहे