Join us  

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, २३ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार; १८ दिवसांत जल बोगद्याची दुरुस्ती पूर्ण

By सीमा महांगडे | Published: April 18, 2023 4:02 PM

३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसांत गुंदवली ते भांडुप संकूल दरम्यानच्या जल बोगद्याची दुरुस्ती पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसात पूर्ण केले आहे. हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, दिनांक २३ एप्रिल २०२३ पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे. 

भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. सदर जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी सदर जलबोगदा ३१ मार्च २०२३ पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस कालावधीसाठी १५ टक्‍के कपात जाहीर करण्यात आली होती. हा जलबोगदा जमिनीपासून सुमारे १०० ते १२५ मीटर खोलवर आहे. हानी पोहचल्याचे ठिकाण भांडुप संकुल झडप (शाफ्ट) पासून सुमारे ४.२ किलोमीटर अंतरावर होते. सुमारे १२५ मीटर खोल व ४.२ किलोमीटर लांब आतमध्ये शिरुन जलबोगद्याची दुरुस्ती करणे, हे जल अभियंता विभाग आणि पाणीपुरवठा प्रकल्प विभागासमोर जणू आव्हानच होते.  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी १३ एप्रिल २०२३ रोजी प्रत्‍यक्ष भेट देत बोगदा दुरुस्ती ठिकाण, दोन्ही झडपांची पाहणी केली. अखेर आज या जलबोगदा दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून अंदाजे ३० दिवसांचा कालावधी दुरुस्तीकरीता अपेक्षित असताना प्रत्यक्ष १८ दिवसांमध्येच ही दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.

असे पूर्ण  झाले काम

बोगदा दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी जल अभियंता खात्याने, पर्यायी जुन्या जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुलापर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि जलबोगदा बंद करुन त्यातील पाणी उपसण्यात आले. जलवाहिन्या व जल बोगद्यावरील झडपांचे नियंत्रण तातडीने केले. एकूण झडपांपैकी सर्वात मोठ्या ३ हजार ७५० मिलीमीटर व्यासाच्या झडपेचे यशस्वीरित्या नियंत्रण केले. प्रत्यक्ष दुरुस्ती काम दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी सुरु झाले. दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ इत्यादी सर्व गोष्टींची सुसज्जता राखली गेली. यानंतर, भांडुप व कापूरबावडी येथील झडपेचे (शाफ्ट) पोलादी घूमट (डोम) कापून क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले. क्रेन व पोलादी पाळण्याच्या सहाय्याने संपूर्ण जल बोगद्याचे निरीक्षण करण्यात आले.  भगदाड पडून हानी पोहोचलेल्या ठिकाणी आतमध्ये पॅकर टाकून विशिष्ट अशा ग्राऊटिंगने पाणी गळती बंद करण्‍यात आली. आतील दुरुस्ती पॅकर व पोलादी प्लेटच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली. त्यानंतर वागळे इस्टेट येथील १०० मीटर खोलीच्या कुपनलिकेमध्ये विशिष्ट प्रकारचे सिमेंट व वाळू यांचे मिश्रण टाकून ते बंद करण्यात आले. बोगद्यातील संपूर्ण उभी केलेली यंत्रणा पुन्हा बाहेर काढण्यात आली. यानंतर कापुरबावडी व भांडुप संकुल येथील पोलादी घुमट (डोम) वेल्डींगच्या सहाय्याने पुन्हा बंद करण्यात आले. हे सर्व काम नियोजन केलेल्या ३० दिवसांच्या तुलनेत १२ दिवस आधीच पूर्ण करण्‍यात आले आहे.

येत्या ३ ते ४ दिवसांत मुंबईतील पाणीपुरवठा पूर्ववत

दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर आता हा जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यापूर्वी पाण्याने भरून घेणे आवश्यक आहे.दरम्यान जल बोगदा पाण्याने भरून घेण्यासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असली तरी या अतिरिक्त पाण्याची पूर्तता करताना सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची देखील प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या सर्व बाबी विचारात घेता, मुंबई महानगराचा पाणीपुरवठा येत्या रविवारपासून पूर्ववत होणे अपेक्षित आहे, असे पालिकेच्या जल अभियंता विभागाने कळविले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :पाणी