मुंबईकरांसाठी खुशखबर! वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:51 PM2023-09-28T12:51:44+5:302023-09-28T12:52:21+5:30

सातही धरणात ९९ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा, कपात केली जाणार नाही

Good news for Mumbaikars! Year-long water worries are over | मुंबईकरांसाठी खुशखबर! वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

मुंबईकरांसाठी खुशखबर! वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात बुधवारी २७ सप्टेंबर रोजी ९९. ६६ टक्के म्हणजेच १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुंबईची पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान, सात धरणांत सद्यस्थितीत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणी कपात होणार नसल्याचे निश्चित झाल्याचे पलिका अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सात धरणात १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे असते. यंदा जून महिना कोरडा गेल्याने १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. परंतु ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने धरण क्षेत्रात हजेरी लावल्याने ८ ऑगस्ट रोजी १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली. परंतु धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ होत नसल्याने सप्टेंबर १५ नंतर आढावा घेत पुन्हा एकदा पाणी कपातीचा निर्णय विचाराधीन असल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून वरुणराजाची धरणात बॅटिंग सुरू असल्याने सातही धरणातील ९९. ६६ टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुंबईची वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणी कपात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालिकेकडून पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे 
  मुंबईतील पाणीसाठा पाहता त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. 
  जलवाहिन्यांमधून होणारी गळती रोखणे, नियोजन करून पाणीकपात करणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असेल. 
  रहिवाशी इमारतींबरोबरच औद्योगिक वसाहतींनाही होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपातीचे नियोजन पालिकेने करायला हवे. असल्याचे जल अभ्यासक सांगतात.

पाणी अपव्ययाने चिंता
  मुंबईत अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याने गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. 
  त्यामुळेही धरणातील पाणीसाठ्यावर त्याचा काहीसा परिणाम होतो. 
  गुंदवली-भांडुप संकुलादरम्यानच्या जलबोगद्याचे पाच महिन्यांपूर्वी नुकसान झाल्याने लाखो दशलक्ष लीटर पाणी वाया गेले होते. 
  अशा घटना त्यानंतरही घडल्याने अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने ठोस उपाययोजनांसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सातही धरणांतील उपलब्ध पाणीसाठा (दशलक्ष लीटर)

भातसा
७,१७,०३७
मोडक सागर
१,२८,९२५
अप्पर वैतरणा
२,२६,०८३
तानसा
१,४४,५९३
मध्य वैतरणा
१,९०,०१२
तुळशी
८,०४६
विहार
२७,६९८

Web Title: Good news for Mumbaikars! Year-long water worries are over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.