BMC Recruitment ( Marathi News ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी भरती करण्यात येत आहे. मात्र या भरतीसाठी उमेदवारांना दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट ठेवण्यात आली होती. याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर आता यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या १५ दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार आहे. सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील. विविध स्तरांवरुन आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिकेने अट रद्द करण्याबाबतचा निर्णय जारी करत म्हटलं आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'कार्यकारी सहायक' (पूर्वीचे पदनामः लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी 'माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात अर्हता लागू होती. तथापि, त्यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्याची मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे.
सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करुन, 'कार्यकारी सहायक' पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होवून येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'कार्यकारी सहायक' (पूर्वीचे पदनामः लिपिक) संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. तर दिनांक ९ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. दरम्यान, या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये- "उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा' आणि 'उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा' या शैक्षणिक अर्हतेतील 'प्रथम प्रयत्नात' ही अट काढून टाकण्यात यावी, अशी सूचना व मागणी विविध स्तरांवरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्या सर्वांचा विचार करून सदर अर्हतेतील 'प्रथम प्रयत्नात' ही अट काढून टाकावी तसेच शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर हाती घ्यावी, सुधारित अर्हतेसह पद भरतीची प्रक्रिया नव्याने राबवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
या निर्देशानुसार, महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. शैक्षणिक अर्हतेची अट सुधारित करुन त्यास मान्यता प्राप्त करणे, सुधारित अर्हता समाविष्ट करुन त्यानुसार पद भरतीची जाहिरात नव्याने प्रसिद्ध करणे, तसेच सुधारित अर्हतेनुसार पद भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेत देखील उचित तांत्रिक बदल करणे, ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कार्यवाही येत्या पंधरा दिवसांच्या आत पूर्ण करून पद भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येईल. नव्या बदलांमुळे आतापर्यतच्या भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांनी साशंकता बाळगण्याची आवश्यकता नाही, नव्याने सुरु होणाऱ्या कार्यकारी सहायक पद भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची देखील आवश्यकता नाही. कारण त्यांचे अर्ज पद भरतीच्या नवीन प्रक्रियेमध्ये देखील ग्राह्य धरले जातील, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आलं आहे.