ख्रिसमसला गोव्यात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 01:38 PM2023-11-19T13:38:00+5:302023-11-19T13:38:22+5:30
सीएसएमटी ते करमाळी (०२०५१ ) ही गाडी २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटेल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नाताळ अर्थात ख्रिसमसनिमित्त पर्यटक आणि गोव्याला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने २२ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते करमाळी, पुणे जंक्शन ते करमाळी आणि करमाळी ते पनवेल या स्थानकादरम्यान या गाड्या धावणार आहेत.
सीएसएमटी ते करमाळी (०२०५१ ) ही गाडी २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटेल. ट्रेन त्याच दिवशी दुपारी २ वाजता थिविमला पोहोचेल. तर थिविम - मुंबई सीएसएमटी (०११५२) ही विशेष दैनिक गाडी थिविम येथून २२ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान दररोज दुपारी ३ वाजता सुटेल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी ३:५० वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. पुणे जं. - करमाळी (०१४४५) विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून २२ आणि २९ जानेवारीला सायंकाळी ५:३० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता करमाळीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. ०१४४६ करमाळी - पुणे जंक्शन (०१४४६) विशेष (साप्ताहिक) २४ आणि ३१ डिसेंबर रोजी करमाळी येथून सकाळी ९:२० वाजता सुटेल. ही ट्रेन रात्री ११:३५ वाजता पुणे जंक्शनला पोहोचेल. गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल.
या ठिकाणी थांबणार
परतीच्या प्रवासासाठी पनवेल - करमाळी ही विशेष गाडी २३ आणि ३० डिसेंबर रोजी पनवेल येथून रात्री १० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वा. ही गाडी करमाळीला पोहोचणार असून, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, रोहा स्थानकावर थांबणार आहे.