मुंबई पोलिस दलातील महिलांसाठी ‘गुड न्यूज’
By मनीषा म्हात्रे | Published: March 3, 2023 09:51 AM2023-03-03T09:51:52+5:302023-03-03T09:52:41+5:30
सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातेला स्तनपान करण्यासाठी ६० बाय ६० ची स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, असे धोरण शासनाने २०१२मध्ये आखले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलिस दलातील महिला पोलिसांना आधीच आपले कर्तव्य आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागते. बाळांना स्तनपानासाठी मुंबई पोलिसांच्या पोलिस ठाण्यातही हिरकणी कक्ष उभारण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात आझाद मैदान, एन. एम. जोशी मार्ग आणि प्रोटेक्शन विभागात महिला दिनानिमित्त पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते ८ मार्चला हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचा मोठा फायदा महिला पोलिसांसह पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदार मातांनाही होणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातेला स्तनपान करण्यासाठी ६० बाय ६० ची स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, असे धोरण शासनाने २०१२मध्ये आखले.
शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक व रहदारीच्या ठिकाणी, महत्त्वाची शासकीय कार्यालये, पोलिस स्थानके, जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालये आदी ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी ती नाही. मुंबई पोलिस आयुक्तालयासह पोलिस ठाणे, विभाग कार्यालये यात हिरकणी कक्ष सुविधा उपलब्ध नाहीत.
महिला पोलिसांना काय वाटते?
अनेकदा बाळ लहान असते. अशावेळी बाळाच्या काळजीबरोबरच कर्तव्य बजावण्याचे दुहेरी आव्हान महिला पोलिसांसमोर असते. अशावेळी हिरकणी कक्ष मोलाचे ठरू शकतो. यासोबतच पाळणाघराची व्यवस्था झाल्यास महिला पोलिसांना मदत मिळेल, अशाही भावना महिला पोलिसांनी व्यक्त केल्या.
प्रादेशिक स्तरावरही लवकरच सुरू
मुंबईत पहिल्या टप्प्यात तीन ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करण्यात येईल. पुढे टप्प्याटप्प्याने प्रादेशिक स्तरासह त्याची संख्या वाढविण्यात येईल.
- सत्य नारायण चौधरी, सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था)
किती महिला पोलिस?
मुंबई पोलिस दलात एकूण ३१ हजार पोलिस कर्मचारी आणि ४ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी आहेत. यामध्ये ६ हजार ७००हून अधिक महिला पोलिस कर्मचारी आहेत, तर, ७०० ते ८०० महिला पोलिस अधिकारी कार्यरत आहेत.