लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
देशभरात कोरोनाचा कहर काहीसा कमी होत असला तरी देखील देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली संधी असल्याचे म्हटले जात आहे. नाईट फ्रँक इंडिया संस्थेच्या ग्लोबल प्राईम इंडेक्स अहवालानुसार जगभरातील ५५ देशांच्या यादीत भारताचा ५४ वा क्रमांक आहे. घरांच्या वार्षिक दरांच्या आधारे कोलकत्ता हैदराबाद व अहमदाबाद येथील घरांच्या किमती वाढल्या आहेत. तर मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई येथील घरांच्या किमती घटल्या आहेत.
नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार भारतातील ८ शहरांच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये कोलकाता शहरात ३.५ टक्के, हैदराबाद शहरात १ टक्के, दिल्ली एनसीआर येथे ०.५ टक्के, अहमदाबाद शहरात ०.३ टक्के दराने किमती वाढल्या आहेत. तर मुंबई महानगर क्षेत्रात -२ टक्के, पुणे शहरात -१.५ टक्के, बंगळूरु शहरात -१.२ टक्के तर चेन्नई शहरात -२.० टक्क्यांनी किमती घटल्या आहेत. वार्षिक दराप्रमाणे या तिमाहीमध्येदेखील या सर्व शहरांतील घरांचे दर कमी झाले आहेत.
जगभरातील इतर देशांमध्येसुद्धा बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कारण जगभरात ५१ शहरांमधील मालमत्तेचे भाव वाढले आहेत. तुर्कीमधील दर २९.२ टक्क्यांनी, न्यूझीलंडमधील दर २५.९ टक्क्यांनी, अमेरिकेतील दर १८.६ टक्क्यांनी, ऑस्ट्रेलियामधील दर १६.४ टक्क्यांनी, कॅनडामधील दर १६ टक्क्यांनी व रशियामधील दर १४.४ टक्क्यांनी वाढले आहेत. संपूर्ण जगात स्पेनमधील घरांचे दर -९ टक्क्यांनी घटले आहेत.