मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ४ हजार घरांची लॉटरी काढण्यात आली असतानाच आता म्हाडाच्या कोकण मंडळाकडून येत्या ऑक्टोबर महिन्यात सुमारे ४ हजार ५०० घरांची लॉटरी काढली जाणार आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ही घरे असणार असून, नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सोमवारी झालेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीच्या कार्यक्रमात कोकण मंडळाच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त १,२०,२४४ पात्र अर्जाची संगणकीय सोडत नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, म्हाडावर लोकांचा विश्वास बसत आहे. म्हाडा लॉटरी पारदर्शक काढत आहे. ज्यांना घर लागणार नाही त्यांनी निराश होऊ नका. कारण आणखी लॉटरी निघणार आहे. सरकार आणखी घरे बांधणार आहे. म्हाडाच्या कामाचा वेग वाढवत आहोत. प्रत्येकाला घर मिळावे म्हणून आम्ही काम करत आहोत. गिरणी कामगारांना आपण घर देत आहोत. त्यासाठी काम करत आहोत. लॉटरीमुळे मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येणार आहे. जे प्रकल्प रखडले आहेत ते पूर्ण करणार आहोत. धारावी पुनर्विकास प्रकल्पावर काम सुरू आहे. आम्ही टीकेला आमच्या कामातून उत्तर देत आहोत. जेवढे आरोप होणार त्याच्या दुप्पट आम्ही काम करणार.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण अधिकाधिक घरे उभी केली पाहिजेत. त्यासाठी आपण काम करत आहोत. प्रीमियम पेक्षा हाउसिंग स्टॉक घ्या, असे मी म्हाडाला सांगितले आहे. त्यामुळे गरिबांना घरे मिळण्यास मदत होणार आहे. आमचा भर हा हाउसिंग स्टॉकवर आहे. ६०० इमारतींना नोटीस दिली आहे. म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंबईवरचा ताण आपण कमी करत आहोत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुंबईला जोडणार आहे. नवी मुंबईत देखील घरे उभी केली जात आहेत. घरांच्या किंमती वाढणार नाहीत याकडे लक्ष देत आहोत. माफक किंमतीत घरे देण्यासाठी काम करणार आहोत.
गृह निर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले की, मुंबईत अधिकाधिक परवडणारी घरे बांधली जातील यासाठी प्रयत्न करू. ऑक्टोबर महिन्यात कोकण मंडळाची लॉटरी काढली जाणार आहे. ज्यांना घर लागणार नाही त्यांनी निराश होऊ नका. कारण आपण आणखी लॉटरी काढणार आहोत. पंढरपूर प्राधिकरणाचे काम म्हाडाला द्यावे, अशी विनंती देखील आम्ही करत आहोत.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल म्हणाले की, लॉटरीमध्ये लागलेल्या घराची किंमत दोन टप्प्यांत भरता येईल. २५ टक्के रक्कम प्रथमतः आणि नंतर ७५ टक्के टक्के रक्कम भरता येईल. सहा महिन्यांत विजेत्यांना घर ताब्यात मिळेल. गिरणी कामगारांना बी डी डी चाळीत घर मिळावे म्हणून काम सुरू आहे. कोकण मंडळाची लॉटरी ऑक्टोबर महिन्यात काढण्यात येणार असून, या लॉटरीत ४ हजार घरे असणार आहेत.
विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.
विजेता अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे.