खुशखबर... महापारेषणमध्ये 8,500 जागांची मेगाभरती, सरकारी नोकरीची मोठी संधी
By महेश गलांडे | Published: October 24, 2020 08:49 AM2020-10-24T08:49:11+5:302020-10-24T08:49:53+5:30
महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे.
मुंबई - कोरोनामुळे राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून एकाही विभागात भरतीप्रक्रिया झाली नाही. मात्र, लॉकडाऊन संपुष्टात येत असल्याने हळूहळू विविध विभागात रिक्त पदांची भरती होणार असल्याचे दिसून येते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डिसेंबरपर्यंत पोलीस भरती पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. आता, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महापारेषण कंपनीत तब्बल 8,500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. महापारेषण कंपनीतील ही रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी शुक्रवारी दिले आहेत. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीद्वारे निर्माण होणार आहे.
ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. सोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
As a gift of #DhammachakrapravartanDay to all #youths in the state, I have instructed Maha-Transco to fill 8500 Technical staff (ITI passed)and Engineers post. MVA govt will do #Megaecruitment at the time when Modi government is snatching jobs.@CMOMaharashtra@INCMaharashtrapic.twitter.com/VWo3vX2zzq
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 23, 2020
आयटीआय उत्तीर्ण तरुणांना या भरती प्रक्रियेमुळे सरकारी विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे, तरुणांनी भरती प्रक्रियेच्या तारखा आणि परीक्षेच्या अभ्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.