Join us

खुशखबर...! म्हाडाच्या घरांच्या किमती आणखी तब्बल १० टक्क्यांनी होणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 5:47 AM

अत्यल्प, अल्प, मध्यम गटातील अर्जदारांना मोठा दिलासा

- अजय परचुरे

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या १,३८४ घरांसाठी १६ डिसेंबरला लॉटरी निघणार आहे. यासाठी अर्ज भरणाऱ्यांना खूशखबर आहे. मुंबई लॉटरीतील उच्च गट वगळता अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील घरांच्या जाहिरातीत दिलेल्या किमती १० टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहेत. यासंदर्भात ११ डिसेंबरला म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची म्हाडा अधिकाºयांसोबत बैठक होणार असून यात या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीतील अत्यल्प गटातील घरांच्या किमती या १४ लाखांपासून ते २० लाखांपर्यंत, तर अल्प गटातील घरांच्या किमती या २० लाखांपासून ते ३५ लाखांपर्यंत आहेत. मध्यम गटातील घरांच्या किमती ३५ ते ६० लाखांपर्यंत, तर उच्च गटातील घरांच्या किमती या ६० लाखांपासून तब्बल ६ कोटींपर्यंत आहेत.

म्हाडाच्या नव्या धोरणानुसार घरांच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी कमी केल्यानंतरही अल्प, अत्यल्प व मध्यम गटांच्या घरांच्या किमती जास्त असल्याचा सूर होता. तो लक्षात घेता मधू चव्हाण यांनी या तीन गटांतील घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी कराव्यात, असे पत्र म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना लिहिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेत किमतीसंदर्भात अभ्यास करून आता म्हाडाच्या घरांच्या किमती आणखी कमी करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय ११ डिसेंबरला घेण्यात येणार आहे.

अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील ज्या अर्जदारांना लॉटरीत म्हाडाचे घर लागेल त्यांच्याकडून लॉटरीत जाहीर झालेल्या आताच्या किमतीपेक्षा१० टक्के रक्कम कमी वसूल करण्यात येईल. यासंदर्भातील निर्णय लवकरच जाहीर होईल.- मधू चव्हाण, सभापती, म्हाडा मुंबई मंडळ

टॅग्स :म्हाडा