गुड न्यूज : मोनोरेलचे कोच आता भारतात विकसित होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 05:18 PM2020-07-04T17:18:14+5:302020-07-04T17:19:02+5:30
चिनी कंपन्यांकडून आलेल्या निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रद्द केल्या असतानाच आता यासाठी तीन भारतीय कंपन्यांनी स्वारस्य दाखविले.
मुंबई : मुंबईतल्या चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणा-या मोनोरेलसाठी दोन चिनी कंपन्यांकडून आलेल्या निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रद्द केल्या असतानाच आता यासाठी तीन भारतीय कंपन्यांनी स्वारस्य दाखविले असून, याबाबतची पुढील प्रक्रिया यशस्वी झाली तर आता मोनोरेलचे कोच भारतात विकसित होतील. सुत्रांकडील माहितीनुसार, स्वारस्य दाखविलेल्या कंपन्यांमध्ये बीएचईएल, बीईएमएल आणि टीटागढ यांचा समावेश आहे. यापैकी बीईएमएल या कंपनीला यापूर्वीच मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चे रॅक बनविण्याचे कंत्राट मिळाले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेच याबाबतची माहिती दिली असून, तीन भारतीय कंपन्यांनी मोनोरेल रोलिंग स्टॉकची डिझाइन आणि विकासासाठी आपण इच्छूक असल्याचे म्हटले आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनीदेखील भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्स, भारत अर्थ मूव्हर्ससह इतर भारतीय कंपन्यांसोबत बोलणे सुरु असल्याचे म्हटले होते. दहा मोनोरेलच्या रॅकसाठी यापूर्वी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. मात्र चीन आणि भारतामधील वाद उफाळत असतानाच, देशभरात सर्वत्र चिनी साहित्याची होळी करण्यात येत असतानाच मोनोबाबतची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. आणि मेक इन इंडिया योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी विकास आणि दीर्घकालीन समर्थनासाठी भारतीय तंत्रज्ञान भागीदार शोधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चिनी कंपन्यांकडून मोनोरेलच्या कंत्राटातील अटींची फेरमांडणी करण्याबाबत सुचित केले जात होते. मात्र प्राधिकरणाला हे शक्य होत नव्हते. परिणामी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. आणि कोविड १९ आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीत आणि मेक इन इंडिया योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने जाहीर केलेल्या विविध धोरणांच्या अनुषंगाने, विकास आणि दीर्घकालीन समर्थनासाठी भारतीय तंत्रज्ञान भागीदार शोधण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, एमएमआरडीएला मोनो रेलच्या डब्यांच्या स्पेयर पार्ट्ससाठी परदेशी उत्पादकांवर अवलंबून रहावे लागते. तेव्हा पुन्हा एकदा स्कोमीसारखी परिस्थिती निर्माण करायची नाही. दोन्ही चिनी कंपन्या निविदा अटी बदलण्याचे म्हणणे मांडत आहेत. परिणामी प्रशासनाने भारतातील तंत्रज्ञान भागीदारांचा शोध घेण्याचा, आणि ते भारतात विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी सांगितले होते.
...........................
२००९ मध्ये निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते चेंबूर येथे देशातल्या पहिल्या आणि एकमेव मोनो रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. एल अॅण्ड टी आणि स्कोमी इंजिनीअरिंग यांच्या संयुक्त कंपनीला बांधकामाचे कंत्राट मिळाले. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत २,४६० कोटी होती.
जून २०१० मध्ये मलेशियातील रवांग येथील स्कोमी इंजिनीअरिंगच्या कारखान्यात मुंबईसाठी तयार होत असलेल्या मोनो रेल्वेच्या डब्याचे अनावरण करण्यात आले. चार डब्यांची पहिली गाडी समुद्रमार्गे मुंबईत दाखल झाली. त्यापूर्वीच, २६ जानेवारी २०१० ला ५०० मीटर अंतराची मोनोची टेस्ट रनही घेण्यात आली.
चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते फेब्रुवारी २०१४ मध्ये उद्घाटन झाले; मात्र मोनोच्या मागार्ला प्रवाशांचा जेमतेम प्रतिसाद होता. जॉय राईड म्हणूनच मोनोने प्रवास केला जात होता.
अडचणी सुरु असतानाच कालांतराने एमएमआरडीएने मोनो स्वत:च चालविण्याचा निर्णय घेतला. एकूण व्यवस्था आटोक्यात आल्यावर मोनोच्या दुस-या टप्प्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.