मुंबई- Monsoon Update : जून महिन्याची २५ तारीख आली तरीही राज्यात अजुनही मान्सून पूर्ण क्षमतेने व्यापलेला नाही. शेतकऱ्यांनी अजुनही पेरणीची कामे केलेली नाही, आता मान्सून संदर्भात हवामान विभागाने महत्वाची अपडेट दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कालपासून राज्यातील काही भागात पाऊस सुरू झाला असून मुंबई, पुण्यात जोरदार पाऊस झाला. पण, आता उर्वरीत सर्व महाराष्ट्रात मान्सून (Monsoon Update) व्यापला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
अखेर मान्सून मुंबईत दाखल; हवामान खात्याने केली घोषणा
मान्सून राजधानी दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी पोहोचला आहे. साधारणपणे मान्सून मुंबईत लवकर पोहोचतो, मात्र यंदा अरबी समुद्रात मान्सूनचे वारे कमकुवत झाल्यामुळे मान्सून दिल्ली आणि मुंबईत जवळपास एकाच वेळी पोहोचला आहे.
काल मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. महाराष्ट्राताली विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला. कालपासून मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुगुर्ग यासह विविध जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. आज हवामान विभागाने आज मान्सूनने महाराष्ट्र व्यापल्याची माहिती दिली.
काल मान्सूनला सुरुवात होताच मुंबईत शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे मुंबईतील गोवंडी परिसरात दोन जण नाल्यात वाहून गेले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंबईतही अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या आणि शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. चेंबूर परिसरात ८० मिमी पाऊस झाला. तर विक्रोळीत ७९ मिमी, सायन ६१ मिमी, घाटकोपर ६१ मिमी, माटुंगा ६१ मिमी पाऊस झाला आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
आजपासून राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करत असल्याचे दिसत आहे. या वर्षी एक महिना मान्सून उशीरा राज्यात दाखल झाला आहे. आज राज्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली.