मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये ९५ टक्के जलसाठा झाला आहे. तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे २१ आॅगस्ट रोजी दहा टक्के पाणीकपात मागे घेतल्यानंतर आता शनिवारपासून उर्वरित दहा टक्के कपातही रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यापुढे मुंबईकरांना पूर्वीप्रमाणेच नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.
जुलैअखेरीस तलावांमध्ये केवळ ३४ टक्के जलसाठा असल्याने पालिका प्रशासनाने ५ आॅगस्टला २० टक्के पाणीकपात लागू केली होती. त्यानंतर तलावांत २५ दिवसांत ६० टक्के जलसाठा झाल्याने २१ आॅगस्टपासून पाणीकपात १० टक्क्यांवर आणण्यात आली होती.वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. शुक्रवारपर्यंत सातही तलाव क्षेत्रांत एकूण १३ लाख ७७ हजार ६९० दशलक्ष लीटर अर्थात ९५.१९ टक्के एवढा जलसाठा आहे. सध्याचा जलसाठा समाधानकारक असल्याने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पाणीकपात मागे घेतली आहे.